Satara: कंपन्यांचा निषेध, अहिरे गावातील सुमारे २० ते २५ तरुण झाडावर उपोषणास बसले
By दीपक शिंदे | Published: September 6, 2023 02:29 PM2023-09-06T14:29:03+5:302023-09-06T14:29:18+5:30
आंदोलनामध्ये सहभागी नसणाऱ्या काही ग्रामस्थांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
श्रीमंत ननावरे
खंडाळा : अहिरे, ता खंडाळा येथील कंपन्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावातील पारावर असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे. या झाडावर सुमारे २० ते २५ तरुण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत प्रशासन येत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे. तसेच वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
अहिरे गावात गेल्या महिन्यात ग्रामस्थांच्या वतीने येथील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व व्यवसायात संधी मिळावी म्हणून आंदोलन उभारण्यात आले होते. या संदर्भात तालुका प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्यासमोर झालेल्या संयुक्त बैठकांमध्ये अहिरे कार्यक्षेत्रातील कंपन्यांनी बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या व त्यांना त्या चांगला प्रतिसाद देत आहेत; परंतु काही कंपन्या प्रतिसाद देत नाहीत. याउलट आंदोलनामध्ये सहभागी नसणाऱ्या काही ग्रामस्थांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून गावात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. यामधून गावामध्ये अनुचित प्रकार, भांडण व संघर्ष घडण्याचा संभव आहे. तसेच या तीन कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे बाकीच्या इतर कंपन्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून तरुणांनी गावातील पारावरील झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे.
संबंधित कंपन्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यास व व्यक्तीस अशा घटनांविषयी आपण सूचित करावे, अन्यथा आम्ही गावाच्या पारावर चढून आत्मदहन करू. त्यास सर्वस्वी कंपन्या व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.