कास धरणाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:37 AM2021-02-14T04:37:09+5:302021-02-14T04:37:09+5:30
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. कास ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधित ...
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. कास ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधित खात्याला निवेदन देऊनही मागण्यांची अद्याप पूर्तता होत नसल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी धरणाच्या भिंतीवर बेमुदत ठिय्या आंदोलन करून कास तलाव उंचीचे काम बंद पाडले. दरम्यान, लाकडाची होळी करून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता; परंतु जलसंपदा विभागाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कास धरणाची उंची वाढविण्याच्या कामामुळे बाधित होणाऱ्यांना पुनर्वसन कायदा लागू करावा, सभोवताली रिंगरोड तयार करून द्यावा, नगरपालिकेत नोकरी द्यावी, कासाईदेवीच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत द्यावी, गावठाणासाठी जागा उपलब्ध करून मिळावी, आदी विविध मागण्यांसाठी कास ग्रामस्थांनी शुक्रवारी आंदोलनास सुरुवात करून मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कास धरणाची उंची वाढविण्याचे काम बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती कास समितीचे माजी अध्यक्ष विष्णू किर्दत यांनी दिला होता.
दरम्यान, दत्ता किर्दत, सोमनाथ बुढळे, अशोक सुर्वे, राम पवार, आदींसह कास गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोमात सुरू आहे. मात्र, धरणक्षेत्रासाठी जमीन संपादित झालेल्या कास ग्रामस्थांच्या मागण्यांकडे वारंवार निवेदने देऊन, बैठका घेऊनही दुर्लक्ष होत असल्याने कास धरण कृती समितीने धरणाचे काम बंद पाडून धरणाच्या भिंतीवर शुक्रवार (दि.१२) पासून बेमुदत ठिय्या आंदोलन केले.
कास धरणासाठी आतापर्यंत तीनवेळा ११५ हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने जमीन संपादित केल्याने त्यांना पुनर्वसन कायदा लागू केला नाही. तिसऱ्या टप्प्यात जमीन संपादन होताना अनेक खातेदार भूमिहीन होणार असल्याने सर्वांना पुनर्वसन कायदा लागू करा, कुटुंबातील एकाला नगरपालिकेत सरकारी नोकरी द्या, धरणाच्या बाजूने रिंगरोड करा, जुने मंदिर पाण्यात गेल्याने नवीन मंदिर बांधून द्या, मुलकी पड गट नं. ७० मध्ये गावठाणासाठी जागा उपलब्ध करून परवानगी द्या, सातारा- कास- बामणोली प्रा. जि. मार्ग २६ जुन्या सर्वेनुसारच त्वरित करा व तो प्रमुख रस्ता कॅनॉलच्या बाहेरुन गावच्या बाजूनेच करावा, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून बांधून द्या, पुनर्वसन दाखले द्या, आदी विविध मागण्या घेऊन कास ग्रामस्थांनी धरणाचे काम बंद पाडून धरणाच्या भिंतीवर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
शुक्रवारी धरणाचे काम बंद पाडून ग्रामस्थांनी धरणावर बेमुदत आंदोलन सुरू करताच जलसंपदा विभागाचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी धरणाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना मागण्या मान्य होतील, आंदोलन मागे घ्या, असे तोंडी आश्वासने दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, शनिवारी धरणाच्या उंची वाढविण्याचे काम पुन्हा सुरू झाले होते.
उदयनराजे आज पाहणी करणार
कास धरणाची उंची वाढविण्याचे काम आणि त्या परिस्थितीत स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले हे आज, रविवारी कासला जाऊन पाहणी करणार आहेत. यावेळी उदयनराजे स्थानिक नागरिकांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे.