कोरोना चाचणीच्या सक्तीमुळे ग्रामस्थांची लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:08+5:302021-06-28T04:26:08+5:30
शामगाव : शामगाव ता. कऱ्हाड येथे कोरोना चाचणीच्या सक्तीमुळे लसीकरणाकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. आलेली लस आरोग्य कर्मचाऱ्यांना परत ...
शामगाव : शामगाव ता. कऱ्हाड येथे कोरोना चाचणीच्या सक्तीमुळे लसीकरणाकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. आलेली लस आरोग्य कर्मचाऱ्यांना परत घेऊन जावे लागत आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगाने सर्व जगात थैमान घातले आहे. यातून आपला देश व गावही चुकले नाही. यातून बाहेर पडण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. काही संस्था व प्रत्येक कुटुंबाचे प्रयत्न आहेत. गेल्या वर्षीपासून या रोगावर औषध शोधण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. याला काही महिन्यांपूर्वी यश आले. शासनाकडून लसीकरण सुरू झाले. लोकांमध्ये थोडेफार गैरसमज असल्यामुळे या लसीकरणाकडे लोकांनी पाठ फिरवली होती. कोरोनाची दुसरी लाट येताच लसीकरणासाठी लोकांची गर्दी झाली. लोकांना लस मिळने कठीण झाले. प्रत्येक गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पन्नास लस येत होती. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर लोकांचे वादविवाद होत होते. यामुळे शासनाला शेवटी लसीकरणाच्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावे लागले. तरीही लोकांना लस मिळत नव्हती. परंतु जिल्ह्यात बाधितांचा दर जास्त असल्यामुळे तपासण्या वाढविण्यात आल्या. लोकांची सक्तीने तपासणी करु लागले आत्ता तर रेशनिंग बंदी तहसील कार्यालय तसेच मोकाट फिरणाऱ्यांची आदी पद्धतीने कोरोना तपासण्या कल्या जात आहेत.
याप्रमाणेच शामगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आठवड्यातून एकदा लसीकरण होते. आठवड्यातून कशीबशी पन्नास शंभर लस उपलब्ध होत असे व त्यासाठी लोकांची झुंबड उडत असे. परंतु शनिवारी शामगावसाठी पन्नास लस आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली. परंतु कोरोना चाचणी करणाऱ्याला लस प्राधान्याने दिले जाईल, असे सरपंच शीतल गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे आरोग्य केंद्रावरील लोकांची गर्दी ओसरली. सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत पन्नास लस संपली नाही. लोकांना फोनवरून व वैयक्तिक निरोप देऊन बोलवले जात होते. तरीसुद्धा येथे फक्त पस्तीस लोकांनी चाचणी करून लस घेतली. बाकी शिल्लक लस आरोग्य विभागाला परत घेऊन जावे लागले. दिवसभर प्रयत्न करूनही लसीकरणाला लोक फिरकत नव्हते. परिणामी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस परत घेऊन जावे लागले. यावरून कोरोना चाचणीस लोकांच्यात अजून गैरसमज आहेत हे लक्षात येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणीस लोकांच्यावर सक्ती करावी लागते आहे.