खंडाळ्यातील गावांची पाणीदारकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:32 AM2019-07-26T00:32:46+5:302019-07-26T00:34:30+5:30

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेतून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून खंडाळा, बेंगरुटवाडी, हरळी, धावडवाडी, बोरी, वेळेवाडी, म्हावशी, झगलवाडी, मोर्वे, लोहोम, केसुर्डी यासह अनेक गावांतून गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.

The villages in the ruins would pass on the water | खंडाळ्यातील गावांची पाणीदारकडे वाटचाल

खंडाळ्यातील गावांची पाणीदारकडे वाटचाल

Next
ठळक मुद्देलोकसहभागाच्या कामाला यश -भविष्यातील चिंता मिटणारगावोगावच्या तलावांत पाणी साचू लागले

खंडाळा : तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गावोगावी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आणि परिसरातील तलावांत खडखडाट झाला होता. भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून गाळमुक्तीचे अभियान राबविण्यात आले होते. पावसाळा सुरू होताच तलाव, बंधारे यातून पाणी साचू लागले आहे. त्यामुळे गाळमुक्तीच्या माध्यमातून जलसंचय करण्यात यश मिळाले आहे. याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असल्याने शेतकरीही समाधानी आहेत.
शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेतून आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून खंडाळा, बेंगरुटवाडी, हरळी, धावडवाडी, बोरी, वेळेवाडी, म्हावशी, झगलवाडी, मोर्वे, लोहोम, केसुर्डी यासह अनेक गावांतून गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. शासनाच्या योजनेतून गाळ उपसण्यासाठी लागणाºया यंत्राच्या इंधनाचा खर्च काही ठिकाणी करण्यात आला होता तर अनेक गावांतून सामाजिक संघटना आणि लोकसहभागातून गाळ उपसण्यात आला. यातून शेतकऱ्यांना केवळ वाहतूक खर्चात स्वत:च्या शिवारात गाळ भरता आला. त्यामुळे माळरानाच्या मुरमाड जमिनी लागवडीखाली येण्यास मदत झाली.
लोकसहभागाच्या माध्यमातून गाळमुक्तीचा हा जागर संपूर्ण तालुक्यात राबला. या मोहिमेतून तलाव, ओढे आणि छोटे बंधारे यांचे खोलीकरण होऊन लाखो लिटर पाण्याचा संचय वाढविला आहे. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी प्रत्येक कामावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून लोकांना या योजनेसाठी प्रेरित केले. जलसंधारणाच्या या कामामुळे भविष्यात होणारे फायदे याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे लोकजागृती अधिक प्रमाणात झाली. त्यामुळे या मोहिमेला बळकटी मिळाली त्यातूनच जलसंचयनाचे मोठे काम उभे राहिले. आता पावसाने याच तलावातून पाणी साचू लागल्याने भविष्यातील चिंता मिटणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग...
गाळमुक्ती करून पाणीसाठा वाढावा, यासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. यामध्ये काही लोकांनी मशिनरी, कंटेनर, ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले तर काही लोकांनी वर्गणी काढून या कामाला हातभार लावला, त्यामुळे तालुक्यात हे काम यशस्वीपणे मोठ्या
प्रमाणात झाले.
खंडाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यातच यावर्षी गावोगावी पाण्याची कमतरता भासली. भविष्यात अडचणी येऊ नयेत म्हणूनच पाणी साठवण प्रमाण वाढणे गरजेचे होते. त्यासाठी अनेक ठिकाणी तलाव, बंधारे, छोटी धरणे यातील गाळ काढण्यात आला. त्यासाठी तालुक्यात विशेष मोहीम राबविली. या योजनेसाठी लोकांनी आणि सामाजिक संघटनांनीही सहकार्य केले, त्यामुळे पाणी संचय होऊ लागला आहे. याचा फायदा शेतकºयांना निश्चित होईल.
- दशरथ काळे, तहसीलदार खंडाळा

Web Title: The villages in the ruins would pass on the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.