गावे बफर झोन करुनही ग्रामस्थ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:34+5:302021-05-16T04:38:34+5:30
फलटण : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अन् मृत्यूदर वाढतच आहे. सोशल मीडियावर निधनाच्या पोस्ट अन् कोविड स्मशानभूमीत दररोज पंधरा ते ...
फलटण : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अन् मृत्यूदर वाढतच आहे. सोशल मीडियावर निधनाच्या पोस्ट अन् कोविड स्मशानभूमीत दररोज पंधरा ते वीस मृतदेहांवर होत असलेले अंत्यसंस्कार पाहता, शासकीय यंत्रणा मृत्यूदर लपवत असल्याचे दिसत आहे. वैद्यकीय यंत्रणाही कुठेतरी कमी पडत आहे. प्रशासनाने अनेक गावे बफर झोनमध्ये टाकली असली तरी ग्रामस्थ रस्त्यावर दिसत आहेत.
ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढविण्याबरोबरच तेथे कडक उपाययोजना करण्याची रणनीती प्रशासनाला राबवावी लागणार आहे. गावातील व्यवहार बंद असले तरी ग्रामस्थांची वर्दळ दिवसाढवळ्या सुरू आहे. जिंती येथे दोन महिन्यात २५ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. एका गावात ही परिस्थिती तर इतर गावातील किती लोक मृत्यूमुखी पडले असतील, याची कल्पना न केलेली बरी. मृत्यूदर कमी दाखविण्यामागची शासकीय यंत्रणेची मानसिकता समजेनाशी झाली आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती भयानक होत चालली आहे. तालुक्यात लसीकरणालाही गती मिळू शकलेली नाही. तालुक्याला लसीचा पुरवठा कमी होत आहे. एखाद्या केंद्रावर शंभर लस येणार असेल तर एक हजारहून अधिक नागरिक गर्दी करतात. या गर्दीतून कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील आजची बधितांची संख्या पाहता, कोरोनाचा विळखा किती घट्ट झाला आहे हे पाहून धक्का बसेल. कोळकी ८२, मुंजवडीत ३०, झिरपवाडीत ६९, मिरेवाडी (दालवडी), हिंगणगाव ३९, जिंती ५८, विडणी ८७, निंबळक ७१, गिरवी ५१, सांगवी ७३, सोमंथळी ५१, सुरवडी २२, वाठार निंबाळकर ८६, तरडगाव ७७, जाधववाडी (फलटण) ४६, नांदल ७, गोखळी ४३, सरडे ३२, साखरवाडी ९०, खटके वस्ती ५२, वाखरी ५१, चौधरवाडी ६७, पिंपरद ३७, राजाळे ३९, गुणवरे ३७ अशी एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे.
रोज पंधरा-वीस जणांवर अंत्यसंस्कार
या गावात अनेक मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, प्रशासनाकडून मृत्यूची आकडेवारी लपवली जात आहे. अनेक लोक बाधित असतानाही लोकं गावात वाडीवस्तीवर फिरत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन फलटण तालुक्यातील मृत्यूंची आकडेवारी चुकीची देत असून, शहरातील पंढरपूर मार्गावरील कोविड स्मशानभूमीत दररोज १५ ते २० लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मृत्यूदर कमी दाखवला जात असल्याच्या चर्चा गावागावात रंगत आहेत. जिल्हा प्रशासन फलटण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात मिळून दोन ते तीन मृत्यू झाल्याचे सांगत आहे. पंधरा दिवस फलटण शहरासह सात गावे प्रशासनाने कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. सर्व दुकाने, बँका, बंद असल्या तरी बाधितांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही.