गावकी बंद... आता फक्त एकी !
By admin | Published: February 24, 2015 10:56 PM2015-02-24T22:56:49+5:302015-02-25T00:06:32+5:30
मरडमुरे ग्रामस्थांचा निर्धार : चुकीबद्दल दंड आकारण्याच्या प्रथेला पूर्णविराम; प्रशासनाला करणार सहकार्य--आॅन दि स्पॉट रिपोर्ट
राजीव मुळ्ये - सातारा आता गावकीच्या माध्यमातून निर्णय होणार नाहीत. कोणत्याही ग्रामस्थाच्या चुकीबद्दल दंड आकारण्यात येणार नाही. कुणाला बहिष्कृत करण्यात येणार नाही. सगळे विषय सामोपचाराने सोडविले जातील. कुणाबद्दल तक्रार असल्यास पोलीस आणि प्रशासनाकडेच ती केली जाईल आणि विकासाच्या रस्त्यावर एकदिलाने वाटचाल करताना प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले जाईल... वर्षभरापूर्वी गावातील एका कुटुंबाला बहिष्कृत करून त्यांच्याकडून दंड वसूल करणाऱ्या मरडमुरे (ता. जावळी) ग्रामस्थांचा हा निर्धार. गावकीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली असली, तरी कायद्यानुसार गुन्हे ठरतील असे निर्णय गावकी करीत असेल, तर अशा प्रथेला पूर्णविराम दिलाच पाहिजे, ही गोष्ट ग्रामस्थांना मंगळवारी मनोमन पटली. तहसीलदार रणजित देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी कौशल्याने हा विषय हाताळून ग्रामस्थांना त्यांची चूक दाखवून दिली. परिस्थितीचे गांभीर्य नजरेस आणून दिले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी प्रबोधनाचे चार शब्द ऐकविले. ‘जावळी तालुक्यातली माणसं चांगलीच आहेत. भांडणं-मारामाऱ्या त्यांचा पिंड नाही,’ असं म्हणून गावकऱ्यांनीही प्रशासन आणि कार्यकर्त्यांना एकीचा शब्द दिला.
तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांना गावातील कोणत्याही सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निमंत्रण मिळेनासे झाले होते. त्यांचा मुलगा सुनील याचा गावातील काही युवकांशी गेल्या वर्षी यात्रेत वाद झाल्यानंतर हा अघोषित बहिष्कार सुरू झाला होता. बहुतांश युवक मुंबईत स्थिरावलेले. सुनीलसुद्धा मुंबईत नोकरी करणारा. अशा वेळी वयोवृद्ध आढाव दाम्पत्याला गावात एकटे पडावे लागले होते. त्यांनी ‘अंनिस’कडे लेखी तक्रार केल्यानंतर ‘लोेकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आणि याप्रश्नी तोडगा दृष्टिपथात आला. मंगळवारी झालेल्या बैठकीत गावकऱ्यांनी कधी नरम, कधी गरम भूमिका घेतली. सुनीलच्याच कशा चुका आहेत, हेही सांगण्याचा प्रयत्न केला. थोडीफार वादावादी झाली. तथापि, तहसीलदार देसाई यांनी नियम आणि कायदेकानू लक्षात आणून देताच गावकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. ‘मुंबईत राहतो म्हणता; मग मीटिंगला यायला अर्धा तास उशीर का केला? मुंबईत काय शिकलात,’ असा सवाल करून सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी कायदेशीर बाबींची जाणीव करून दिली. ‘एखाद्याकडून सक्तीने दंड वसूल केला तर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे दंडाची प्रथा कायमची बंद व्हायला पाहिजे,’ अशी तंबी तहसीलदारांनी दिली तर ‘यापुढे गावकीची बैठक होऊन कुणाला बहिष्कृत केल्याचे समजले तर परिणामांना तयार राहा,’ असे पाटील यांनी सुनावले. अखेर या प्रथा बंद केल्याचे ग्रामस्थांनी लेखी दिले. बहिष्कृत दाम्पत्याला दिलासा मिळून प्रकरणावर पडदा पडला.
नवविचारांची शाळा भरली
बैठकीसाठी मुद्दाम आलेल्या ‘अंनिस’च्या डॉ. शैला दाभोलकर यांना शाळा दिसताच बैठकीची तयारी होण्यापूर्वी त्यांनी लहानग्यांशी संवाद साधला. श्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय, निर्भयपणे कसे वागावे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कोणत्या विचारांसाठी हौतात्म्य पत्करले, याविषयी मुलांना त्यांनी माहिती दिली. ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांच्यासोबत मुलांनी ‘शूर गडी तू, वीर गडी तू, छोट्या गोष्टींना का घाबरतो तू’ हे गाणेही गायिले. लिंबू-मिरची, भूतबाधा, करणी अशा प्रकारांनी भांबावून न जाता कणखरपणे अशा गोष्टींना विरोध करण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांनी लहानग्यांमध्ये या निमित्ताने पेरली. तहसीलदार देसाई यांनीही मुलांकडून कविता आणि पाढे म्हणवून घेतले.
अशा पारायणाने विठ्ठल पावेल?
चूक करणाऱ्या ग्रामस्थांकडून वेळोवेळी गोळा केलेल्या दंडाचा हिशोब कोण ठेवतो, त्या पैशांचे काय केले जाते, असे सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित करताच ग्रामस्थांनी यात्रा आणि पारायणासाठी हा पैसा खर्च केल्याचे सांगितले. ‘लोकांना जबरदस्तीने दंड करून त्या पैशातून पारायण भरवता? अशा पारायणाने विठ्ठल कधी पावेल का,’ असा सवाल अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना केला. ‘दंड वसूल करण्याचा प्रकार कधी थांबेल,’ या प्रश्नाला पोलीस पाटील दत्ताराम दिनकर आढाव यांनी ‘आजपासून लगेच,’ असे उत्तर दिले.
लोकशाही मार्गाने पुढे या
आढाव दाम्पत्याचा मुलगा सुनील याने फेसबुकवर गावाविषयी अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्याची तक्रार मरडमुरे गावकऱ्यांनी बैठकीत केली. या विषयावरून थोडी वादळी चर्चाही झाली. तथापि, ‘त्याला शिक्षा देण्याचा अधिकार गावकीला कुणी दिला,’ या प्रश्नावर गावकरी गप्प झाले. ‘प्रश्न कोणताही असो, लोकशाही मार्गानेच तो सोडविला पाहिजे. कायदा हातात घेऊन कुणाला दंड ठोठावला, तर खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागेल,’ अशी तंबी प्रशासनाकडून देण्यात आली. आढाव दाम्पत्याला २५ हजारांचा दंड ठोठावून नंतर एक हजारांवर तडजोड करण्यात आली आणि तो वसूलही करण्यात आला, अशी कबुली गावकऱ्यांनी दिली. यापूर्वीही गावकीने काही जणांकडून दंड वसूल केल्याचे बैठकीदरम्यान समोर आले.