नागरिकांमुळे बचावले वायरमनचे प्राण
By admin | Published: March 27, 2015 10:56 PM2015-03-27T22:56:58+5:302015-03-27T23:58:39+5:30
एका घरातून शिडी आणून त्यांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले
सातारा : येथील मल्हार पेठेत शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विद्युत कर्मचारी खांबावर चढून दुरुस्ती करीत असताना वीजप्रवाहित तारेला चिकटून बसला. काही दक्ष नागरिकांच्या प्रयत्नांमुळे या कर्मचाऱ्यास सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण बचावले.याबाबत माहिती अशी, साईसिंग रमशा पवरा (वय २६, रा. गोडोली, सातारा) हे वीजवितरण कंपनीत विद्युत सहायक म्हणून कार्यरत आहेत. ग्राहकाची तक्रार आल्यामुळे शुक्रवारी सकाळी ते मल्हार पेठेतील खांबावर चढून दुरुस्ती करीत होते. त्यावेळी तारांमधील विद्युतप्रवाह बंद करण्यात आला होता. परंतु परिसरातील जन्नित्रांमधून उलटा येणारा विद्युतप्रवाह एका तारेतून वाहत होता. त्या तारेला हात लागल्याने पवरा हे तारेला चिकटून बसले.दरम्यान, पवरा यांनी आरडाओरडा केल्याने ही बाब परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी ‘महावितरण’मध्ये याबाबत माहिती देण्याबरोबरच पवरा यांना वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. सुमारे आठ ते नऊ मिनिटे पवरा हे तारेला चिकटून बसले होते. त्यानंतर परिसरातील एका घरातून शिडी आणून त्यांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)