किसन वीर यांच्या पुरस्काराने भरून पावलो- विनायकराव पाटील : पुरस्कार प्रदान कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:29 PM2018-09-02T22:29:51+5:302018-09-02T22:29:59+5:30
वाई : ‘आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या-ज्या क्रांत्या झाल्या. त्या क्रांतिकारकांच्या ओळीतील आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा, या भावनेतून जात असताना आबांच्या नावाच्या पुरस्काराचा हात पाठीवर पडल्याने भरून पावलो,’ असे भावोद्गार माजी मंत्री, वनाधिपती विनायकराव पाटील यांनी काढले.
किसन वीरनगर, ता. वाई येथे देशभक्त आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विनायकराव पाटील यांना ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या हस्ते आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उर्वरित महाराष्टÑ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, डॉ. नीलिमा भोसले, केतन भोसले, डॉ. सुरुभी भोसले, प्रल्हादराव चव्हाण, अॅड. जयवंतराव केंजळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.
माजी मंत्री पाटील म्हणाले, ‘काही लोकं काळाच्या पुढचं पाहतात. त्यामुळे त्याचं महत्त्व त्यावेळी वाटत नसतं. जेट्राफा लागवडीबाबत असो किंवा अगदी विजय तेंडुलकरांच्या नाटकांच्या बाबतीत असो हेच घडलं आहे. तसेच शेती आणि सहकारातील प्रयोगाबाबत आहे. सर्वच प्रयोग काही यशस्वी होत नाहीत म्हणून प्रयोग करणं सोडता कामा नये. किंबहुना अनेक प्रयत्नातून एखादा प्रयत्न यशस्वी होतो म्हणूनच त्याला प्रयोग म्हणतात.
उल्हास पवार म्हणाले, अनेकांनी आपल्या आयुष्याचा होम केला तेव्हा हे स्वातंत्र मिळालंं. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी झटताना अनेकांनी एकोपा जपला; पण सध्याच्या काळात राजकीय मतभेदांना द्वेषाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. अशा परिस्थितीत मांगल्याचं रुप म्हणजे विनायकराव पाटील आहेत. तर विलासराव शिंदे हे आजच्या काळातील आश्वासक आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेती उद्योगात घेतलेली भरारी थक्क करणारी आहे.
संचालक नंदकुमार निकम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्नेहल दामले व दत्तात्रय शेवते यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. प्रताप देशमुख यांनी आभार मानले.
सातारा जिल्हा चळवळींची प्रयोगशाळासामाजिक, राजकीय चळवळींची प्रयोगशाळा सातारा आहे. संपूर्ण महाराष्टÑात कोणत्याही चळवळीवर साताºयाच्या तपासणीचा शिक्का असावाच लागतो. अशा सातारा जिल्ह्यात खूप मोठी माणसं निर्माण झाली. याच भूमितील यशवंतराव चव्हाण हे माझं आराध्य दैवत तर आबासाहेब वीर यांच्यात अखेरपर्यंत दडलेलं एक खेळकर मूल माझा दोस्त होता. त्यांच्या स्वभावाच्या अनेक वैशिष्ट्यांचा जवळून अनुभव घेता आला. म्हणूनच आबांच्या नावाचा पुरस्कार ‘आनंदाचे डोही’ ही भावना निर्माण करणारं आहे.’,असे गौरवोद्घार माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी काढले.
किसन वीरनगर, ता. वाई येथे आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्ताने विनायकराव पाटील व विलासराव शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उल्हास पवार, प्रतापराव भोसले, मदन भोसले, गजानन बाबर उपस्थित होते.