पाटण येथे उल्लंघन करणारी दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:08+5:302021-04-15T04:38:08+5:30
रामापूर : पाटण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, अनेक दुकानदार उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. पाटण शहरात सोमवारी जिल्हाधिकारी ...
रामापूर : पाटण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, अनेक दुकानदार उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. पाटण शहरात सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी दोन दुकानांवर कारवाई करून त्यांची दुकाने सील करण्यात आली.
पाटण शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व अत्यावश्यक सेवेतील दुकानात पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी करणाऱ्या दुकानांवर नगरपंचायतीने कारवाई करून, त्यांच्याकडून सुमारे ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. नियमांचे पालन न करणाऱ्या दंडात्मक कारवाई अशीच पुढे चालू ठेवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिषेक परदेशी व नगराध्यक्ष अजय कवडे यांनी दिली.
पाटण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यासाठी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोमवार हा पाटणचा आठवडा बाजार असल्याने, या दिवशी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक पाटण शहरात येत असतात. त्यामुळे होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पाटण नगरपंचायतीने खबरदारी घेत सोमवारचा आठवडा बाजार रद्द केला होता, अशा सूचनाही स्पीकरद्वारे दिवसभर करण्यात आल्या. मात्र, सोमवारी नगरपंचायतीच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. कारण बाहेरून पाठीमध्ये अनेक व्यापारी दाखल झाले होते, तसेच खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकानेही सर्रासपणे सुरू होती. काही दुकानात नियमांचे उल्लंघन होत होते. ही सर्व परिस्थिती पाहता, पाटण नगरपंचायत प्रशासनाने सकाळपासून कारवाईचा धडाका सुरू केला. बिनामास्क असणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकानेही सर्रासपणे सुरू होती. अशा दुकानांवर पाटण नगरपंचायतीने कारवाई करून दोन दुकाने सील केली. या कारवाईत पाटण नगरपंचायतचे मुख्य अधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष अजय कवडे, विष्णू चव्हाण, सुनील चौधरी, सूर्यकांत चव्हाण, रघुनाथ नायकवडी राजेशिर्के, प्रकाश भोसले यांच्यासह नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.