नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:05+5:302021-01-13T05:40:05+5:30
सातारा : शासन नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ...
सातारा : शासन नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदीच्या अटी शिथिल केल्याने बाजारपेठेत सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील खणआळी, मोती चौक, जुना मोटर स्टॅँड, तहसील कार्यालय परिसर गर्दीने गजबजून जात आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने नागरिक निर्धास्त झाले आहेत.
पालिकेची दंडात्मक कारवाई बारगळली
सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू केलेली कारवाईची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वारताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापारणाऱ्यांवर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. यानंतर पालिकेकडून शहरात दंडात्मक कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र, गेल्या महिनाभरापासूून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.
झुडपांमुळे पुलावर अपघाताचा धोका
किडगाव : सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. या झुडपांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. धोकादायक वळण त्यात झुडपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणारा हा मार्ग असल्याने वाहनधारकांची या मार्गावरून सतत रेचलेच सुरू असते. त्यामुळे बांधकाम विभागाने ही झुडपे तातडीने हटवावीत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.