नागरिकांकडूून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:14+5:302021-09-22T04:43:14+5:30
नियमांचे उल्लंघन सातारा : संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर ...
नियमांचे उल्लंघन
सातारा : संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदीच्या अटी शिथिल केल्याने बाजारपेठ रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहत आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने नागरिकांमध्ये निर्धास्तपणा वाढू लागला आहे.
सातारा पालिकेची
कारवाई थांबली
सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पालिकेकडून काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.
दिशादर्शक फलक;
रिफ्लेक्टरची मागणी
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरचा अभाव जाणवत आहे. संबंधित विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
सातारा शहरात
पाण्याचा अपव्यय
सातारा : सातारा शहरातील शनिवार पेठ, बुधवार नाका, शाहू चौक व देवी चौकात असलेल्या व्हॉल्व्हला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. या व्हॉल्व्हची पालिकेकडून दुरुस्ती केली जात नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकीकडे पालिका प्रशासनाकडून पाणी बचतीचे नियोजन केले जाते, तर दुसरीकडे व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.