कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार : ढोकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:17 AM2021-02-28T05:17:41+5:302021-02-28T05:17:41+5:30
लोणंद : ‘जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेकजण दुर्लक्ष करत आहेत. अशा दोनशे नागरिकांवर कारवाई करून ५० हजार ६०० ...
लोणंद : ‘जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेकजण दुर्लक्ष करत आहेत. अशा दोनशे नागरिकांवर कारवाई करून ५० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लोणंदमधील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी,’ असे आवाहन मुख्याधिकारी हेमंत गोखले यांनी केले आहे.
लोणंद नगरपंचायतचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले व लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या नियोजनानुसार मागील आठवड्यात शहरातील विनामास्क फिरत असणाऱ्या १९८ जणांवर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या दहाजणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पन्नास हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा पुन्हा होणारा वाढता प्रभाव पाहता सुरक्षितेच्या दृष्टीने शहरातील नागरिकांनी शहरात विनामास्क फिरू नये तसेच व्यापारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सॅनिटायझरचा वापर करावा. शहरात अनावश्यक न फिरणे, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर न पडणे, सर्व व्यापारी, फळ भाजीपाला विक्रेत्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची टेस्ट करून घेऊन रिपोर्ट स्वतःजवळ ठेवणे याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील मंगल कार्यालय मालकांनी कायदेशीर लेखी परवानगीशिवाय विधी करू नये. नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. ३१ मार्चपर्यंत दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार, मार्केट कमिटी येथे भरणारा शेळी मेंढी बाजार बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.