पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्याच्या विरोधात कराडमध्ये भाजपाची तीव्र निदर्शने, पोलिसांकडून आंदोलकांना अटक
By प्रमोद सुकरे | Published: December 17, 2022 02:30 PM2022-12-17T14:30:41+5:302022-12-17T14:31:07+5:30
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिले
कराड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद टीका करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथील दत्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने देशभर जोरदार आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून कराड येथे भाजपाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘बिलावल माफी मांगो’ अशा घोषणा देत भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.
यावेळी बोलताना अतुल भोसले म्हणाले, जगात सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अश्लाघ्य विधान करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा सर्वस्तरातून आम्ही निषेध करत आहोत. आपल्या अपरिपक्व मताने भुट्टो यांनी त्यांच्या देशाची लाज वेशीवर टांगली आहे. स्वत:च्या देशातील समस्या सोडविता येत नसल्याने अशी विधाने करुन ते खळबळ माजविण्याचा प्रयत्न करत असून, याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
मोदींच्या माध्यमातून जगात सर्वत्र भारताचे नाव उंचावत असताना, दहशतवाद्यांचा अड्डा असणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने केलेले विधान निंदनीय आहे. भविष्यात अशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला भारताकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी यावेळी दिला.
आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, तालुकाध्यक्ष श्मामबाला घोडके, युवामोर्चाचे सुदर्शन पाटसकर, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, सुनील शिंदे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबा गावडे, राजू मुल्ला, बाळासाहेब घाडगे, सुरज शेवाळे, तानाजी देशमुख, संतोष हिंगसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.