सत्तासंघर्षाला हिंसक वळण
By admin | Published: March 19, 2015 11:42 PM2015-03-19T23:42:56+5:302015-03-19T23:54:57+5:30
दोन पोलीस जखमी : सोसायटी अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने गोरे बंधूंमधील
दहिवडी : आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यात माण तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र सत्तासंघर्षाने गुरुवारी हिंसक रूप धारण केले. आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकली नाही, तेव्हा दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेक आणि घोषणा युद्ध झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
आंधळीत हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुरांची नळकांडी फोडण्याची तयारी पोलिसांनी केली, तेव्हा जमाव पांगला. दहिवडी येथेही दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्षाच्या घटना घडल्या.
याबाबतची माहिती अशी, आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली होती. पदाधिकारी निवडीसाठी नूतन संचालकांची बैठक गुरुवारी बोलविण्यात आली होती. या निवडीबाबत आमदार जयकुमार गोरे गट व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे गट यांच्यात चुरस निर्माण झाली होती. आमदार गोरे यांच्या गटाकडे सहा सदस्य तर शेखर गोरे गटाकडे सात सदस्य होते. एका सदस्याच्या अपहरणाची फिर्यादही दाखल झाली होती.
दोन्ही गटांत या निवडीवरुन टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता.
(पान १ वरून) त्यामुळे पोलिसांच्या पत्रानुसार, दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पदाधिकारी निवडीवेळी १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. असे असूनही दोन्ही गट समोरासमोर आले.
दुपारी एक वाजता पदाधिकारी निवडी होणार होत्या; पण निवडणूक निर्णय अधिकारी पी. ए. तायडे हे या प्रक्रियेलाच उपस्थित राहिले नाहीत. त्यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पदाधिकारी निवडीची प्रक्रियाच रद्द करण्यात आली.
सोसायटी कार्यालयातून दोन्ही गटांचे संचालक बाहेर आल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळातच काही समजण्याच्या आत दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक सुरू झाली. काहीजणांकडून पेटते बोळे फेकण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे मोठी चकमक उडाली. दगडफेकीचा फटका कार्यकर्त्यांबरोबरच पोलिसांनाही बसला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांच्या वाहनाची मागील काच फुटली.
दोन पोलीस जखमी झाले. खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. तरीही जमाव नियंत्रणात येत नव्हता. अखेर पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडण्याची तयारी केली. ते पाहून जमाव पांगला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. डॉ. देशमुख हे आंधळी येथे घटनेची माहिती घेत असतानाच दहिवडी येथे काही जणांना मारहाण करण्यात आल्याची माहिती त्यांना समजली. लगेचच राजलक्ष्मी शिवणकर व दंगल नियंत्रण पथकाने दहिवडीकडे मोर्चा वळविला.
अघोषित संचारबंदी
दहिवडीमध्ये काही जणांना मारहाण करण्यात आली. दगडफेकीच्या
घटना घडल्या.
त्यामुळे आंधळीप्रमाणेच दहिवडी येथेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंधळी आणि दहिवडी अशा दोन्ही ठिकाणी दुपारनंतर संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.