यूट्यूबचा सदुपयोग! तारुखमधील युवकाने माळरानावर फुलविली शेवग्याची शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:01 PM2022-06-02T17:01:46+5:302022-06-02T17:03:37+5:30

लाॅकडाऊनमध्ये गॅरेज बंद पडले. उदरनिर्वाह कसा करायचा, असा यक्षप्रश्न समोर आला आणि वडिलार्जित जमिनीकडे लक्ष वेधले. यूट्यूबवर शेतीविषयी काही व्हिडिओ पाहिले आणि शेवगा पिकाची निवड केली.

Vipul Kurade a youth from Tarukh in Karhad taluka successfully cultivated sugarcane on a rocky hill | यूट्यूबचा सदुपयोग! तारुखमधील युवकाने माळरानावर फुलविली शेवग्याची शेती

यूट्यूबचा सदुपयोग! तारुखमधील युवकाने माळरानावर फुलविली शेवग्याची शेती

googlenewsNext

कुसूर  : ‘काही तरी करायचे, या विचाराने पछाडले आणि पारंपरिक शेतीला फाटा देत खडकाळ माळावर शेवग्याची यशस्वी शेती फुलवत अन्य शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, असा प्रयोग तारुख येथील युवकाने करून दाखवला आहे. कमी खर्च आणि योग्य नियोजनामुळे तो भरपूर फायदा मिळवत आहे.

कऱ्हाड तालुक्यातील तारुख येथील युवक विपुल कुराडे यांचे कऱ्हाड येथे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज होते. लाॅकडाऊनमध्ये गॅरेज बंद पडले. उदरनिर्वाह कसा करायचा, असा यक्षप्रश्न समोर आला आणि वडिलार्जित जमिनीकडे लक्ष वेधले. पारंपरिक शेतात खर्चाच्या तुलनेत फायदा कमी मिळत असल्याने पारंपरिक पिकांबरोबर शेतात वेगळे काही तरी करायचे, या उद्देशाने यूट्यूबवर शेतीविषयी काही व्हिडिओ पाहिले आणि शेवगा पिकाची निवड केली.

वेळ न घालवता आटपाडी येथे जाऊन शेवगा लागवडीची माहिती घेतली आणि मुरमाड असलेल्या जमिनीवर शेवगा लागवड करण्याचा निर्णय घेतला. लागवडीसाठी रोपांना खर्च  असल्याने आटपाडी येथूनच शेवग्याच्या बिया आणल्या आणि सरी पाडून थेट शेतात बीजारोपण केले. आंतरपीक म्हणून भाजीपाला घेत पाण्याचे योग्य नियोजन करत शेवग्याचे योग्यरित्या संगोपन केले.   

अवघ्या चार महिन्यांत झाडांना फुलांचा बहर चालू झाला. सहाव्या महिन्यात शेंगा विक्रीस परिपक्व तयार झाल्या आणि बाजार सुरू झाले. एकदा लागवड केल्यास बारमाही पीक देणाऱ्या वाणाची लागवड करण्यात आल्याने उत्पन्न चालू झाले. आठ दिवसाला शेंगांचा तोडा सुरू झाला आहे. सध्या बाजारात शेंगांना चांगला भाव मिळत असल्याने शेवगा शेती फायद्याची ठरत आहे. कृषी विभागाच्या सहाय्यक ज्योती शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने शेवग्याच्या झाडांची सुधारणा होत आहे.

पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीची कास धरणे ही काळाची गरज आहे. योग्य नियोजन आणि कमी खर्चात बारमाही शेवगा पिकाची लागवड फायद्याची ठरत असल्याने, युवा शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधले. - विपुल कुराडे,युवा शेतकरी

Web Title: Vipul Kurade a youth from Tarukh in Karhad taluka successfully cultivated sugarcane on a rocky hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.