जिल्ह्याच्या राजकारणात व्हायरस : रामराजे
By admin | Published: January 22, 2016 11:22 PM2016-01-22T23:22:33+5:302016-01-23T01:06:26+5:30
‘जयाभाव’चे उपोषण राष्ट्रवादीच्या जिव्हारी : ढेबेवाडीत अजितदादा अन् शशिकांत शिंदेंचीही फटकेबाजी
कऱ्हाड : जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील आमदार जयकुमार गोरे यांचे उपोषण गुरुवारी सुटले; पण त्याचे पडसाद शुक्रवारी ढेबेवाडीत राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात उमटले. माजी मंत्री शशिकांत शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगल्या चाललेल्या संस्थेत राजकारण नको, असे सांगत जिल्ह्यातील राजकारणात आलेल्या व्हायरसचा बंदोबस्त करायलाच हवा, अशा भाषेत जयकुमार गोरेंवर निशाणा साधला.
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, ‘जिल्हा बँकेचा कारभार व्यवस्थित चालला आहे. कारभार करताना कुठेही काहीही चुकलेलं दिसत नाही; पण काहींनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी बँकेसमोर उपोषणाचा प्रयोग केला; पण त्यांच्या या ढोंगीपणाला इथली जनता थारा देणार नाही,’ असे सांगून जिल्हा बँकेतील पदाधिकाऱ्यांना चांगल्या कारभाराचे जणू सर्टिफिकेटच दिले.रामराजेंनी आपल्या भाषणात, ‘कॉम्प्युटरमध्ये ज्याप्रमाणे ‘व्हायरस’ येतो, त्याप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणात एक ‘व्हायरस’ आलाय. ‘त्या व्हायरस’ चा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल,’ असे शशिकांत शिंदे यांच्याकडे बघत ते म्हणाले. रामराजेंचा हा सुचक इशारा अनेकांच्या त्वरित ध्यानी आला. माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, ‘आज राज्यात अन् देशात युतीचं सरकार आहे. ते राष्ट्रवादीला त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतातच; पण आमचे मित्रपक्षही काही मागे नाहीत,’ असे म्हणत शिंदेंनी गोरेंच्या उपोषणाला हात घातला. ते म्हणाले, ‘कालच जिल्हा बँकेसमोर एक आंदोलन झालं. खरंतर राजकारणात सत्ता संघर्ष जरूर असावा. इर्षा जरूर असावी; पण चांगल्या चाललेल्या संस्थेत राजकारण मात्र आणले जाऊ नये. या बेगडी आंदोलनाला जिल्ह्यातील काही काँग्रेसजनांनी पाठिंबा दिला नाही. त्यांनाही धन्यवाद देतो.’
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मनमानी विरोधात आमदार जयकुमार गोरे यांनी ७२ तासांचे यशस्वी उपोषण केले. गोरेंच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांनी उपोषण सोडले खरे; पण बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी या आंदोलनाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. ‘गोरेंच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नाही,’ अशी गुगली त्यांनी टाकली. तर उपाध्यक्ष सुनील मानेंनी ‘गोरेंचे आंदोलन म्हणजे, डोंगर पोखरून उंदीर शोधण्यातला प्रकार आहे,’ अशी टिप्पणी केली.
या साऱ्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने ते आंदोलनाच्या विषयावर नेमके काय बोलणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे नेत्यांनी या विषयाचा समाचार घेतलाच. (प्रतिनिधी)
नेत्यांनी पत्रकार परिषद टाळली !
शुक्रवारच्या कार्यक्रमात व्यासपीठावरील नेत्यांचे पत्रकार कक्षाकडे बारीक लक्ष होते. ‘माध्यमांचे प्रतिनिधी नेत्यांचं काय करतील, हे सांगता येत नाही,’ असा सूरही अनेकांनी आपल्या भाषणात आळवला. दरम्यान, पत्रकारांनीही ‘कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घ्या,’ अशी व्यासपीठावर चिठ्ठी पाठविली; पण त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत नेत्यांनी कार्यक्रम उरकताच गाडीत बसून निघून जाणे पसंत केले.