कोयना पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच; नवजाला फक्त १४ मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:25+5:302021-08-12T04:44:25+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण एकदम कमी झाले. मंगळवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक १४ मिलीमीटर पाऊस झाला, ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण एकदम कमी झाले. मंगळवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक १४ मिलीमीटर पाऊस झाला, तर कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९०.५६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणातील पायथा वीजगृहातूनच २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यांपूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. हा एक विक्रम ठरला. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता, तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस तुरळक स्वरूपात होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. परिणामी काही धरणांतून विसर्ग कमी करण्यात आला तर काहीमधून बंद करण्यात आलेला आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १३ मिलीमीटर पाऊस झाला तर यावर्षी जूनपासून ३४१९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. नवजा येथे १४, तर आतापर्यंत ४३६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ९ आणि जूनपासून ४४६२ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
.........