महू धरणातून विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:50+5:302021-07-28T04:40:50+5:30
पाचगणी : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पातील महू धरण जलाशयात पाणीसाठा पूर्ण झाल्याने सोमवारी रात्रीपासून विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ...
पाचगणी : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पातील महू धरण जलाशयात पाणीसाठा पूर्ण झाल्याने सोमवारी रात्रीपासून विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने या यावर्षी प्रथमच धरणे जुलै महिन्यात ओव्हरफ्लो झाली आहेत. महू धरणसुद्धा त्याला अपवाद नाही. भिलार पाचगणी डोंगरमाथ्यावर पडत असलेल्या पावसाचे पाणी धरणात येत असल्याने धरण सोमवारी संध्याकाळी भरून सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे.
या संदर्भात धरण व्यवस्थापनाने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ग्रामस्थांना याबाबत इशारा दिला होता. त्याच रात्री सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहण्यास सुरुवात झाली आहे. अजून धरणाला दरवाजे नसल्याने धरण भरताच सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहण्यास सुरुवात होते.
चौकट :
नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन
सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने येणाऱ्या पाण्याच्या येरव्यात घट झाली असल्याने नदीपात्रात पडणारे पाणी पाचशे क्युसेकच्या आसपास आहे. तरी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
फोटो २७महू धरण
जावळी तालुक्यातील महू धरणातून विसर्ग सुरू केला आहे. (छाया : दिलीप पाडळे)