महाबळेश्वरमधील विशाल अग्रवालचे बेकायदेशीर हॉटेल सील

By दीपक शिंदे | Published: June 1, 2024 06:54 PM2024-06-01T18:54:44+5:302024-06-01T18:55:23+5:30

रहिवाशी इमारतीचा व्यावसायिक वापर : विनापरवाना बारही होता सुरु

Vishal Agarwal illegal hotel sealed in Mahabaleshwar | महाबळेश्वरमधील विशाल अग्रवालचे बेकायदेशीर हॉटेल सील

महाबळेश्वरमधील विशाल अग्रवालचे बेकायदेशीर हॉटेल सील

महाबळेश्वर : शासकीय मिळकतीचा गैरवापर केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल याचे हॅाटेल एम पी जी क्लब हे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सील करण्यात आले. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता अभय हवालदार यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या भुमिकेमुळे महाबळेश्वर शहर परिसरातील हॅाटेल उद्योगात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे येथील कल्याणीनगरात झालेल्या कार अपघातानंतर या अपघातातील मुख्य आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन उघडकीस आले. विशाल अग्रवाल यांनी पारशी जीमखाना या ट्रस्टकडे रहिवास कारणासाठी असलेली शासकीय मिळकत स्वतः कडे घेतली. या ट्स्टवर असलेले यांचे नावे वगळून स्वतःच्या घरातील नावे ट्स्टी म्हणून घेतली. त्यानंतर या मिळकतीमध्ये तारांकित हॅाटेल बांधले. अशाप्रकारे रहिवासाकरीता शासनाकडून मिळालेल्या जागेचा वाणिज्य वापर सुरू केला. यासाठी विशाल अग्रवाल यांनी या मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकाम केले आहे.

याबाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. दरम्यान पुणे येथील कल्याणीनगर येथे अपघात झाला आणि विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे देखील हॅाटेल असल्याचे उघडकीस आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने एमपीजी क्लब या हॅाटेलमधील बार बंद केला होता. तर शनिवारी सकाळी साडे सात वाजता प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पालिकेच्या पथकाने या हॅाटेलवर धडक मारली. हॅाटेलवर कारवाई करण्यासाठी पथक येताच हॅाटेल व्यवस्थापनाने हॅाटेल मधील सर्व पर्यटकांच्या ताब्यात असलेल्या खोल्या खाली करण्यास प्रारंभ केला.

सकाळी साडे नऊ वाजता हॅाटेल मधील खोल्या सील करण्याची कारवाई पथकाकडुन सुरू करण्यात आली. या पथकाने हॅाटेल मधील ३२ खोल्या, ८ कॅाटेज, स्पा, जीम, रेस्टॅारट, किचन, स्वागतकक्ष, स्टाफ रूम स्टोअर रूम अशा ४८ खोल्यांना सील ठोकले. कारवाई केल्यानंतर महसूल विभागाच्या वतीने या कारवाईचा पंचनामा करण्यात आला. शेवटी हॅाटेलचे गेट सिल करून कारवाई पूर्ण करण्यात आली. या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याची माहीती प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली. या कारवाईवेळी तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह पालिकेचे अधिकारी हे देखील उपस्थित होते.

हॉटेल टाळे ठोकले वीज पुरवठाही केला बंद

शासकीय मिळकतीचा गैरवापर केल्याप्रकरणी महसूल विभागाने एमपीजी क्लब या हॅाटेलला टाळे ठोकले. तसेच कारवाई पूर्ण झाल्यानंतर या हॅाटेलचा वीज पुरवठा देखील तात्काळ बंद करण्यात आला.

Web Title: Vishal Agarwal illegal hotel sealed in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.