विशाल पाटील गटाचा मोहनराव कदमांना पाठिंबा
By admin | Published: November 15, 2016 11:34 PM2016-11-15T23:34:48+5:302016-11-15T23:34:48+5:30
विधानपरिषद निवडणूक : जयंत पाटील शत्रू, तर कदमांशी वाद कायम असल्याची भूमिका
सांगली : जयंत पाटील हे आमचे क्रमांक एकचे शत्रू आहेत. त्यांना विरोध म्हणून, तसेच पक्षीय आदेशाचा मान राखून आम्ही विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा बंडखोर गटाचे नेते विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, कदम गटाबद्दलची आमची नाराजी आणि त्यांच्याशी असलेला वाद संपलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले की, मोहनराव कदम यांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी आमची मागणी होती. महापालिकेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला, त्याच गटाचा उमेदवार निवडून येऊ नये, अशी आमची भूमिका होती. त्यामुळेच त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली. कदम गटाबद्दलची नाराजी आम्ही त्यांच्यासमोरही मांडली आहे. तरीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा वाद तूर्त बाजूला ठेवून उमेदवारास पाठिंबा देण्याची सूचना केली. त्यांच्या या सूचनेप्रमाणे आम्ही कदम यांना पाठिंबा देत आहोत. आमची त्यांच्याबद्दलची नाराजी कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे आमचे क्रमांक १ चे शत्रू आहेत. त्यांना विरोध म्हणूनही आम्ही पाठिंबा दिलेला आहे.
कदम गट यापुढे जयंत पाटील यांच्या राजकारणात सहभागी होणार नाही, या गोष्टीवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवत आहोत. त्यांनी जयंतरावांशी कोणतीही ‘अॅडजेस्टमेंट’ नाही, हे जाहीर करावे. अशोक चव्हाण यांच्यासोबतच्या बैठकीत आमच्यातील वादावर पडदा पडलेला नाही. केवळ विधानपरिषद निवडणुकीतील पाठिंब्याचा विषय होता. तो आम्ही मान्य केला आहे. निवडणुकीनंतर चव्हाण यांच्याकडून पुन्हा अंतर्गत वादाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्हाध्यक्षपदाची चर्चा
जिल्हाध्यक्षपद गेली २५ वर्षे एकाच तालुक्यातील एकाच गटाकडे असल्याबाबतची तक्रार आम्ही केली आहे. दुसऱ्याला संधी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत विचार करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे, असे विशाल पाटील म्हणाले.
जयंतरावांचे कुजके राजकारण
संपूर्ण जिल्ह्यात जयंत पाटील कुजके राजकारण करीत आहेत. त्यांच्या या राजकारणाविरोधात आम्ही आघाडी उघडली आहे. त्यांचे हे राजकारण संपविण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. त्यांनीच ‘पॅकेज संस्कृती’ सांगलीत आणली. प्रत्येक संस्थेत आम्ही त्यांना विरोध केलेला आहे. दुसऱ्याच्या संस्थेत अतिक्रमण करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे, असे विशाल पाटील म्हणाले.
शेखर माने गैरहजर : कदम यांना पाठिंबा जाहीर करताना विशाल पाटील यांच्यासह उपमहापौर विजय घाडगे, स्वाभिमानी आघाडीचे शिवराज बोळाज, तसेच दहा नगरसेवक उपस्थित होते. मात्र, बंडखोर उमेदवार शेखर माने गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विशाल पाटील म्हणाले की, पाठिंब्याबाबत उमेदवार म्हणून त्यांना तांत्रिक अडचण आहे. तरीसुद्धा आमची भूमिका जाहीर करताना त्यांच्याशी चर्चा झालेलीच आहे. पाठिंब्याचा निर्णय सर्वानुमते झालेला आहे.