नेपाळ-श्रीलंकेच्या सहकारी बँक अधिकाऱ्यांची जिल्हा बँकेस भेट
By Admin | Published: July 25, 2016 10:32 PM2016-07-25T22:32:28+5:302016-07-25T23:35:11+5:30
सहकारी बँकिंग क्षेत्रात जिल्हा बँक ही देशात नामांकित असून,
सातारा : ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरणासाठी व उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याच्या अभ्यासासाठी नेपाळ व श्रीलंका तसेच भारत देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था पुणे यांच्यावतीने भेट दिली.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव पाटील, प्रकाश बडेकर व कांचन साळुंखे उपस्थित होत्या. सहकारी बँकिंग क्षेत्रात जिल्हा बँक ही देशात नामांकित असून, या बँकेच्या संचालक मंडळाने जिल्_ाच्या कृषी विकासासाठी कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी व कृषी सहकार आणि ग्रामीण भागात विविध कारणांसाठी करत असलेले अर्थसहाय्य याचा अभ्यास व जिल्हा बँकेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी ही भेट आयोजित केली होती. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या ठेवी, कर्ज, वसुली, भाग-भांडवल, लाभांश, एनपीए, स्वयंसहाय्यता बचत गट, प्रशिक्षण केंद्र, शेतकरी ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी, किसान क्रेडीट कार्ड, विविध कर्ज योजना, बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल नाबार्डचे मिळालेले पुरस्कार, लिम्का बुकमध्ये झालेली नोंद आदींची माहिती दिली.बँकेचे सरव्यवस्थापक एस. एन. जाधव व एम. व्ही. जाधव यांनी परदेशी पाहुण्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसर केले व बँकेच्या कर्ज वसुलीमागील नियोजन तसेच कर्जाच्या विविध योजना ठळकपणे मांडल्या.
या भेटीप्रसंगी चर्चेत सहभागी होताना नेपाळ सहकार खात्याचे असिटंट कमिशनर मुदिया चामिंडा यांनी सहकारात कामकाज करणाऱ्या इतर बँकांनी जिल्हा बँकेच्या कामाचा आदर्श घ्यावा, असे सांगितले. नेपाळ राष्ट्रीय बँकेचे डेप्युटी डायरेक्टर रामहरी दहल यांनी बँकेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनेचे कौतुक केले.
नेपाळ व श्रीलंका या देशांतील विविध बँकांचे पदाधिकारी यांनी बँकांच्या विविध योजनांची माहिती घेतली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख, डी. जी. पोफळे, आर. एस. गाढवे, आर. डी. खळदकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)