..अखेर आई अन् बछड्याची झाली भेट!, बछड्यासोबत काही हौशींनी काढले होते सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:34 PM2022-09-22T16:34:03+5:302022-09-22T17:11:50+5:30

..तर मोठी दुर्घटना घडण्याची होती शक्यता

Visit to with a leopard calf and leopard mud from the Sajjangad area | ..अखेर आई अन् बछड्याची झाली भेट!, बछड्यासोबत काही हौशींनी काढले होते सेल्फी

..अखेर आई अन् बछड्याची झाली भेट!, बछड्यासोबत काही हौशींनी काढले होते सेल्फी

googlenewsNext

परळी : किल्ले सज्जनगडावर, तसेच सभोवतालच्या परिसरात बिबट्याचा वावर होता. परिसरातील वाड्या-वस्त्यांमधून अनेक शेळ्या, मेंढ्या गायब होत होत्या. या परिसरात अनेकांनी बिबट्या व त्याचे बछडे पाहिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी दुपारी सज्जनगड परिसरात बछडा खेळताना आढळल्याने ही गोष्ट आता अधोरेखित झाली आहे. अखेर मंगळवारी वन विभागाने सापळा रचून बछडा व आईचे मिलन घडवून आणले.

सज्जनगडानजीक मंगळवारी दुपारी असलेल्या रामघळ परिसरात बछडा खेळताना आढळला होता. यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तो बछडा वन हद्दीत ठेवून त्याचे व त्याच्या आईचे मिलन घडवून आणण्यासाठी रेस्क्यू टीम तयार केली होती. त्याठिकाणी छुपे कॅमेरेही लावण्यात आले होते. बछड्याला खुराड्यात ठेवण्यात आले होते. रात्री पावणेदहा वाजेदरम्यान मादी बिबट्या अंदाज घेत आपल्या बछड्याजवळ आली. आपल्या जिभेने चाटत तिने अलगद उचलून बछड्याला घेऊन गेली. वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या सहकारी टीमने सापळा रचून बछडा व आईचे मिलन घडवून आणले.

वन्य प्राण्यांबरोबर सेल्फी, फोटो काढणे गुन्हाच...

सज्जनगड परिसरात मंगळवारी बिबट्याचा बछडा काही युवकांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्यांनी तेथील अंदाज घेत त्या बिबट्याबरोबर फोटो काढण्यास सुरुवात केली. खरंतर हा गुन्हाच मानला जातो. कारण त्या वेळेस मादी बिबट्याने हल्ला केला असता, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे या प्रकारे कुठेही वन्यप्राणी आढळून आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क करून माहिती द्यावी, तसेच प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहनही यावेळी वन विभागाकडून करण्यात आले.

Web Title: Visit to with a leopard calf and leopard mud from the Sajjangad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.