हिमालयातील पाहुणे ‘सह्याद्री’च्या पाटण खोऱ्यात; ‘मोरकंठी लिटकुरी’ने लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 10:21 AM2022-01-23T10:21:12+5:302022-01-23T10:21:36+5:30

दुर्मीळ पाखरांचाही वावर अधोरेखित

Visitors from the Himalayas to the Patan valley of the Sahyadri; ‘Morkanthi Litkuri’ caught the attention | हिमालयातील पाहुणे ‘सह्याद्री’च्या पाटण खोऱ्यात; ‘मोरकंठी लिटकुरी’ने लक्ष वेधले

हिमालयातील पाहुणे ‘सह्याद्री’च्या पाटण खोऱ्यात; ‘मोरकंठी लिटकुरी’ने लक्ष वेधले

Next

-संजय पाटील

कऱ्हाड : सह्याद्री प्रकल्पात आजपर्यंत वेगवेगळ्या २५४ प्रजातींची नोंद झाली आहे. त्याबरोबरच काही पाहुणे पक्षीही येथे तात्पुरते स्थलांतरित होतात. सध्या हिमालयात आढळणारा ‘मोरकंठी लिटकुरी’ याच्यासह अन्य काही पक्ष्यांचे प्रकल्पात दर्शन होत असून, हिवाळ्यानंतर हे पक्षी पुन्हा उत्तरेकडे स्थलांतरित होतील.

पश्चिम घाटात पाचशे प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी २५४ प्रजातींची नोंद सह्याद्री प्रकल्पात झाली असून, काही प्रदेशनिष्ठ पक्ष्यांच्या प्रजाती केवळ ‘सह्याद्री’तच आढळतात. येथील समृद्ध पक्षी जीवन पाहता भारतीय पक्षी संवर्धन संस्था व बीएनएचएस या संस्थांनी कोयना व चांदोली जंगल क्षेत्राला महत्त्वाचे पक्षीक्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

सह्याद्रीत कीटक भक्षी, मांस भक्षी, रस पिणारे, फळ खाणारे, शिकारी, बिया खाणारे, मासे खाणारे असे विविध प्रकारचे पक्षी आहेत. त्याबरोबरच काही पक्षी स्थलांतरित होऊन मर्यादित कालावधीसाठी या प्रकल्पात वास्तव्य करतात. सध्या त्यापैकीच एक असणारा ‘मोरकंठी लिटकुरी’ अर्थात ‘निलटवा’ नावाचा पक्षी प्रकल्पातील पाटण खोऱ्यात आढळून येत आहे.

कऱ्हाडातील आकाश राजेश जठार हे सह्याद्रीत पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करत असताना त्यांना हा पक्षी आढळून आला. हिवाळ्यात हिमालयातील तीव्र थंडीपासून बचाव करण्यासाठी हा पक्षी दोन हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करून दक्षिणेत येतो आणि हिवाळ्यानंतर पुन्हा तो उत्तरेकडे मार्गक्रमण करतो, असे सह्याद्री अभ्यासक योगेश शिंगण यांनी सांगितले.

सूर्यपक्षी, पहाडी कोतवालही प्रकल्पात...

तांबड्या पाठीचा शिंजीर म्हणजेच सूर्यपक्षी हा स्थानिक असला तरी तो सहसा दृष्टीला पडत नाही. आकाश जठार यांना हा पक्षी पाटणनजीक आढळला. तर अरवली पर्वतामधून तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित होणारा पहाडी कोतवालही पाटण परिसरात दृष्टीस पडला आहे.

कोयना अभयारण्यात २००३ साली हिमालयात आढळणारा ‘भारतीय निळा दयाळ’ तर २००७मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानात ‘राजगिधाड’ दिसले होते.

प्रकल्पात आढळणारे महत्त्वाचे पक्षी

  • पांढऱ्या पाठीचे गिधाड
  • भारतीय गिधाड
  • राजगिधाड
  • ठिपकेदार गरुड
  • महाधनेश
  • लोटेनचा सूर्यपक्षी
  • नीलगिरी रानपारवा
  • नदी सुरय
  • मलबार पोपट
  • श्रीलंकन बेडूकमुखी
  • मलबार राखी धनेश
  • पांढऱ्या गालाचा तांबट
  • मलबार तुरेवाला चंडोल
  • निळा माशीमार
  • तांबूस सातभाई

Web Title: Visitors from the Himalayas to the Patan valley of the Sahyadri; ‘Morkanthi Litkuri’ caught the attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.