पुणे-मुंबईचे पर्यटक लवकरच मेढामार्गे कास पठारावर जाणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2016 10:38 PM2016-01-29T22:38:07+5:302016-01-29T23:54:26+5:30

शिवेंद्रराजेंची माहिती : कुसुंबी-कोळघर रस्त्यासाठी सव्वाचार कोटी

Visitors of Pune and Mumbai will soon travel to Kasa Plateau via Medha. | पुणे-मुंबईचे पर्यटक लवकरच मेढामार्गे कास पठारावर जाणार..

पुणे-मुंबईचे पर्यटक लवकरच मेढामार्गे कास पठारावर जाणार..

Next

सातारा : सातारा-जावळी मतदार संघातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचे ध्येय ठेवणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर कुसुंबी-कोळघर रस्त्यासाठी तब्बल ४ कोटी २६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे बामणोली, गाळदेव यासह पंचक्रोशीतील गावे जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा बाजारपेठेस डांबरी रस्त्याने जोडली जाणार आहेत. तसेच पर्यटकही मेढामार्गे कास पठारावर येणार आहेत.
‘जेथे रस्ता तेथे विकास’ हे गतिमान विकासाचे सूत्र आहे. जावळी तालुक्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भाग रस्त्याविना विकासापासून वंचित राहत असल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचा धडाका लावला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले तरच ही गावे विकासाच्या प्रवाहात येतील, हे त्यांनी ओळखले आहे. बहुतांश गावे पक्क्या डांबरी रस्त्याने जोडली गेल्याने त्या-त्या गावातील लोकांना आरोग्यासह अन्य आवश्यक सुविधांचा लाभ होत आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पारंबे फाटा, एकीव, चिकनवाडी, सह्याद्रीनगर, अंधारी, कोळघर या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. दरम्यान, कुसुंबी ते कोळघर या घाटरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होता. या रस्त्याचे काम मार्गी लागल्यास बामणोली, गाळदेव, सह्याद्रीनगर, सांगवी मुरा, तेटली आदी पंचक्रोशीतील गावे तालुक्याच्या मुख्यालयाला जोडली जातील. या भागातील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघेल. जावळी तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील खेडी-पाडी एका चेन लिंकला जोडली जातील, यासाठी हा रस्ता होणे गरजेचे आहे, हे ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या रस्त्याला निधी उपलब्ध होण्यासाठी अथक प्रयत्न केले.
कुसुंबी ते कोळघर या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने याही रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)

कास पर्यटकांना मिळणार शॉर्टकट...
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराला भेट देण्यासाठी पुणे, मुंबई यासह इतर शहरे आणि परदेशातून दरवर्षी असंख्य पर्यटक येत असतात. पुणे, मुंबईमार्गे येणाऱ्या पर्यटकांना साताऱ्यातून कास पठारावर यावे लागते; मात्र कुसुंबी-कोळघर रस्त्यामुळे या पर्यटकांना शॉर्टकट मिळणार आहे. हे पर्यटक पाचवड येथूनच मेढा, कुसुंबी, कोळघर मार्गे कास पठारावर पोहोचणार असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होणार आहेच; पण एक टोलही (आनेवाडी) वाचणार आहे. त्यामुळे कुसुंबी-कोळघर रस्त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांचीही मोठी गैरसोय दूर होणार आहे.

Web Title: Visitors of Pune and Mumbai will soon travel to Kasa Plateau via Medha.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.