विवेक वाहिनीचे आता ‘युवा मानस मैत्री’ अभियान : हमीद दाभोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 09:00 PM2018-06-06T21:00:22+5:302018-06-06T21:00:22+5:30
सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.
येथील तारांगणमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात विवेक वाहिनीच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी डॉ. हमीद दाभोलकर यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘बदलती जीवनशैली आणि वाढत्या अपेक्षांमुळे तरुणांमध्ये ताणतणाव आणि इतर मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये १५ ते ३५ वयोगटांतील लोकांचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात ५० हजारांपेक्षा अधिक तरुण आत्महत्या करतात. ही गोष्ट देशासाठी खूप गंभीर आहे. त्यामुळे असे विचार मनात येणाºया तरुणाईला योग्य भावनिक आधार देणे ही तातडीची गरज आहे. परंतु असे असताना देशात मानसिक उपचार खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मानसिक आजारांबाबत लोकांमध्ये जागरुकताही नाही. यासाठीच महाराष्ट्र विवेक वाहिनीने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र विवेक वाहिनीचे विद्यार्थी युवा मानस मित्र, मैत्रीण म्हणून काम करतील. मानसिक तणावग्रस्त विद्यार्थी ओळखणे त्यांना भावनिक आधार देणे आणि त्यांना योग्य उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्यास प्रवृत्त करणे, ही कामे करतील. त्यासाठी युवा मानसमित्रांना योग्य ते प्रशिक्षणही विवेक वाहिनीकडून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात या कार्यशाळेत करण्यात आली. राज्यभारत पुढील वर्षात एक हजार मानस मित्र, मैत्रिणी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सोशल मीडियाचाही यासाठी प्रभावी उपयोग केला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विवेक वाहिनीच्या या कार्यशाळेत डॉ. शैला दाभोलकर, डॉ. चित्रा दाभोलकर, कुमार मंडपे, देगावचे सरपंच गणेश राठोड, कृष्णात कोरे, उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वाघेश साळुंखे, योगेश जगताप, अजय ढाणे यांनी परिश्रम घेतले.
..........................................................................................