चाफळच्या विकासात ‘व्हॉट्सअॅप’चा हातभार!
By admin | Published: February 22, 2015 10:22 PM2015-02-22T22:22:01+5:302015-02-23T00:23:11+5:30
दहा मुले दत्तक घेण्याचा संकल्प : ‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’ ग्रुपच्या माध्यमातून पन्नास मित्र एकवटले
चाफळ : संगणकीय व नवीन तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉट्स अॅपचा वापर कोणी कशासाठी करेल, याचा नेम नाही. अनेकदा गैरवापराचीच चर्चा अधिक होते. याला अपवाद ठरले चाफळकर. व्हॉट्सअॅपवर ‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’ या गु्रपच्या माध्यमातून चाफळमधील पन्नास मित्र एकत्र आले. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी चाफळच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली.
‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’च्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवरील मित्रांनी गप्पागोष्टी, विनोद अन् राजकारणाला मूठमाती देत गावात एकविचाराने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज हे ५० मित्र आॅनलाईन बैठका घेतात. त्या माध्यमातून गावात कोणते उपक्रम राबवायचा, यावर चर्चा करतात. यामध्ये चाफळसह, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे एवढेच नव्हे तर नायझेरिया व अमेरिकेत नोकरीनिमित्त असलेले हे सर्व मित्र एकत्र आले. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, आयटी मॅनेंजर, आर्मी, फायर ब्रिगेड, नेव्ही, लॉयर बँकर्स, सॉप्टवेअर डेव्हलपर्स, तहसीलदार, पत्रकारांचा समावेश आहे. ही मंडळी रोजच्या कामातून वेळ काढत गु्रपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतात. ‘आम्ही चाफळकर फाउंडेशन’ने आपल्या कार्याचे पहिले पाऊल टाकले आहे. चाफळमधील दहा विद्यार्थ्याना दत्तक घेऊन त्यांचा एक वर्षाचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याचे जाहीर केले आहे. (वार्ताहर)