मतदारांना उबदार ब्लँकेट, खाद्य तेलाचे डबे...!

By admin | Published: November 9, 2016 01:15 AM2016-11-09T01:15:00+5:302016-11-09T01:15:00+5:30

आचारसंहितेचे पथक कागदावरच : प्रभाग सहा आणि सातमध्येच नगराध्यक्षपदाचे वेध

Voters are warm blankets, edible oil containers ...! | मतदारांना उबदार ब्लँकेट, खाद्य तेलाचे डबे...!

मतदारांना उबदार ब्लँकेट, खाद्य तेलाचे डबे...!

Next

वडूज : नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण असल्याने काही प्रभागांत या पदासाठी उमेदवारांची चढाओढ असली तरी खरी लढत प्रभाग सहा आणि सातमध्येच संभाव्य नगराध्यक्षपदासाठी आत्तापासूनच रस्सीखेच सुरू आहे. राजकारणातील सर्व आयुुधे या प्रभागात वापरली जाणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. या प्रभागातील मतदारांची दिवाळी बऱ्यापैकी गोड गेली असली तरी अजून तरी मतदारांच्या वरचा प्रलोभनाचा वर्षाव काही थांबेना. थंडीचे प्रमाण वाढल्याने या प्रभागातील मतदारांसाठी उबदार ब्लँकेट आणि खाद्य तेलाचे डबेसुद्धा वाटप होत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
तालुक्याचे मुख्यालय म्हणून वडूज शहराची ओळख असली तरी राज्याला हीच नगरी हुतात्म्यांची भूमी म्हणूनच परिचित आहे. सध्या या नगरीत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मतदार खूश करण्यासाठी वेगवेगळे प्रकार अंमलात येत आहेत. यातील एक भाग म्हणून ऐन दिवाळीत ठराविक उमेदवारांकडून मतदारांना कपडे ,भाऊबीज स्वरूपात रोख रक्कमेसह मिठाईचे बॉक्स घरपोच झाले असल्याची चर्चा ताजी असतानाच काही प्रभागांत उबदार ब्लँकेट अन् खाद्य तेलाचे डबेसुद्धा उमेदवारांकडून चिठ्ठी देऊन काही दुकानांतून दिले जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लोकशाहीमधील ‘मतदार राजा’ हा निवडणुकी पुरताच केंद्रबिंदू असतो. याची प्रचिती पुन्हा एकदा वडूज नगरपंचायत निवडणुकी दरम्यान असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. मतदार जनजागृतीमुळे म्हणा किंवा संभाव्य उमेदवारांमुळे मतदार संख्येत वाढ झाली असून, शहराची भौगोलिक रचना ही बदलत आहे.
शहराच्या बाहेर ही लोकवस्तीत वाढ होऊन भविष्यात नगरपंचायत हद्दवाढ ही अटळ आहे. वडूज नगरपंचायतमुळे या परिसराचा विकास झपाट्याने होईल यात शंका नाही. मात्र, लोकशाहीतील निवडणुकीला अशा प्रलोभनामुळे विकासकामांना खीळ बसेल, अशी सुप्त भीतीही जाणकारांमधून जाणवते.
या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक तुल्यबळ होणार असेच चित्र असून, नगरीचा विकासात्मक अजेंडा कोण राबवितो याकडे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकी दरम्यान जाहीरनामे आणि वचननामे निघतीलच याकडे जागृत मतदारांचे लक्ष केंद्रित करणे याकडे उमेदवारांचा कल जादा राहणार आहे. मात्र, मतदारांना वेगवेगळ्या प्रलोभनामुळे आकर्षित करण्याचे प्रकार काही उमेदवारांना घातकी ही ठरू शकते. ऐन दिवाळीत काही उमेदवारांकडून मतदारांना दाखविली जाणारी आमिषे संभाव्य निवडणुकीला तडा जाणारी असली तरी या बाबीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न ही पुढे येत आहे.
यासंदर्भात संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या चर्चा वडूज नगरीत सुरू आहेत. तर यासाठी असणारे पथक कागदावरच असल्याचे दिसून येते. शुक्रवार, दि. ११ रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्यामुळे या घटनेकडे पथकाचे दुर्लक्ष असेल, असा अंदाज काही जाणकरांमधून व्यक्त होत आहे. सर्वच निवडणुकी दरम्यान वडूज शहराचे वातावरण हे खेळीमेळीचे असते. हा इतिहास संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच वडूज नगरीत प्रलोभनांचा वर्षाव होत असल्याने मतदार द्विधा मन:स्थितीत आहे.
नगरीचा विकास आणि ठोस विचार करून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना या अशा आर्थिकदृष्ट्या तगड्या उमेदवारांना शह देण्यासाठी आता नेकमे काय करायचे? हा यक्ष प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी)
पारदर्शक निवडणुकीची अपेक्षा
या नगरीला प्रथम हुतात्म्यांची भूमी म्हणून ओळखले जाते त्याचे कारण ही तसेच आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी ९ सप्टेंबर १९४२ रोजी तालुक्यातील शूरवीरांनी हौतात्म्य पत्करले होते. त्याचीची आठवण म्हणून या नगरीला प्रसंगी ‘हुतात्मा नगरी’ असे संबोधले जाते. लोकशाही अंमलात येण्यासाठी याच तालुक्यातील काही शूरांनी आपल्या प्राणाची आहुती देशासाठी अर्पीत केली होती. याची जाणीव आजच्या पिढीला नसणे ही शोकांतिका ठरत आहे. या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी सर्वच स्तरावर आजअखेर प्रयत्न वडूज नगरीमध्ये विविध उपक्रमांमुळे होत असल्याचे दिसते. त्यामुळे या सर्व बाबींची जाण ठेवून स्वच्छ व पारदर्शक निवडणुका व्हाव्यात, अशी माफक अपेक्षा ही जाणकार मतदारांकडून होत आहे.
 

Web Title: Voters are warm blankets, edible oil containers ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.