मतदार बँकेच्या रांगेत अन् उमेदवार मतदारांच्या दारात..!

By admin | Published: November 18, 2016 11:10 PM2016-11-18T23:10:12+5:302016-11-18T23:10:12+5:30

कोरेगावातील स्थिती : नोटा बंदीच्या निर्णयाचा फटका; छोट्या प्रभागामुळे उमेदवारांच्या सतत भेटी

Voter's bank queue and candidates at the door of voters ..! | मतदार बँकेच्या रांगेत अन् उमेदवार मतदारांच्या दारात..!

मतदार बँकेच्या रांगेत अन् उमेदवार मतदारांच्या दारात..!

Next

कोरेगाव : केंद्र सरकारने नोटा बंदीचा निर्णय अचानक घेतल्याने सर्वसामान्यांचे धाबे दणाणले आहेत. नोटा बदलण्यासाठी राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांबाहेर लोकांनी रांगा लावलेल्या आहेत. ऐन निवडणुकांच्या मोसमात हा बदल झाल्याने नेतेमंडळींसह उमेदवारांची चांगलीच गोची झालेली आहे. नगरपंचायत निवडणुकीत छोटे प्रभाग असल्याने उमेदवार सातत्याने मतदारांच्या भेटी घेत असला तरी सध्या मतदार बँकेच्या रांगेत आणि उमेदवार मतदारांच्या दारात असे काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर व्यापारी पेठ म्हणून कोरेगावचा नावलौकिक आहे. शहरातील ग्रामपंचायतीचे आता नगरपंचायतीत रूपांतर झालेले असून, नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आगामी आठवड्यात होत आहे. नगरविकास विभागाने शहरातील प्रभागांची विचित्र पद्धतीने आणि तांत्रिकदृष्ट्या रचना केल्याने मतदारांबरोबरच उमेदवारांना अवघड होऊन गेले आहे. समानता कोठेही नसल्याने काही प्रभागांत शेकड्यात तर काही प्रभागांत हजारांमध्ये मतदार आहेत. भौगोलिक असमानता असल्याने एकाच प्रभागात फिरताना दोन प्रभाग ओलांडावे लागत आहेत. ऐन दिवाळीच्या धामधुमीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारांनी थेट मतदारांवर लक्ष केंद्रित करत त्यांची दिवाळी चांगली केली. मिठाईबरोबरच सुकामेव्याचा पाऊस पडल्याने आणि अनेकांना वस्तुरूपी दिवाळी गिफ्ट मिळाल्याने मतदार राजा चांगलाच सुखावला होता.
त्यानंतर अवघ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट चलनातून बाद केल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांची बोलतीच बंद झालेली आहे. सरकारने आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा बदलताना काही जाचक अटी घातल्या असल्याने लोकांना हातातील कामधंदे सोडून केवळ नोटा बदलण्यासाठी बँकांच्या दारात तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. ऐन निवडणुकांच्या मोसमामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेणाऱ्या नेतेमंडळींसह उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Voter's bank queue and candidates at the door of voters ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.