‘खरेदी-विक्री’तही मतदारांची पळवापळवी

By admin | Published: June 11, 2015 10:38 PM2015-06-11T22:38:11+5:302015-06-12T00:44:14+5:30

जावळी तालुका : नेत्यांचा मतदारांवर अविश्वास, मतदार पाठविले सहलीवर

Voters' rides in 'buy and sell' | ‘खरेदी-विक्री’तही मतदारांची पळवापळवी

‘खरेदी-विक्री’तही मतदारांची पळवापळवी

Next

कुडाळ : जावळी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीला भलतेच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ताधारी सुनेत्रा शिंदे गटाला संघात राजकीय अडचणी निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, जितेंद्र शिंदे यांनी उमेदवार रिंगणात उतरविल्याने सुनेत्रा शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर त्यांना आमदार शशिकांत शिंदे यांची मदत होत आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी मतदारांना सहलीवर पाठविण्यात आले आहे.
संघाच्या स्थापनेपासून खरेदी-विक्री संघाची सत्ता कुडाळच्या शिंदे कुटुंबीयांकडेच राहिली आहे. मात्र, या पंचवार्षिक निवडणुकीत सुनेत्रा शिंदे यांच्या कुटुंबातूनच त्यांना परखड विरोध होत आहे. जितेंद्र शिंदे यांनी चार उमेदवार उभे करून विरोध दर्शविला आहे. तर जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी सात उमेदवार रिंगणात उतरवून आपला पुन्हा एकदा हिसका दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार, हे निश्चित.
तर सहकारी संस्था मतदारसंघातील ३९ मतदारांवरच विजयाची सूत्रे अवलंबून असल्यामुळे या मतदारांवरच नेत्यांचे अधिक लक्ष आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात दीपक पवार यांनी उमेदवारी लढवून सहा मते मिळविली होती. त्यामुळे आमदार शिंदे अस्वस्थ झाले होते.
तर पुढील बँकेच्या निवडणुकीत आपला बँकेतील प्रवेशाला कोणतीही अडचण येऊ नये या दृष्टीने आमदार शिंदे यांनी या पुढील तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सुनेत्रा शिंदे गटाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे यापूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणारे, एकाच पक्षातील दोन्ही गट एकत्र आलेले राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. जावळीतले राजकीय वातावरण भलतेच तापलेले पाहायला मिळत आहे.
त्यामुळेच खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद सुनेत्रा शिंदे यांच्या पाठीशी उभी केली आहे. निवडणुकीत मतदान फुटीचा फटका बसू नये या दृष्टीने निवडणुकीची सर्व सूत्रे आमदार शिंदे हेच फिरवत
आहेत.
त्यामुळेच तालुक्यातील सहकारी संस्थांचे जवळपास १५ मतदारांना निवडणुकीपूर्वीच सहलीवर पाठविण्यात आले आहे. तरीदेखील या मतदारांच्या संपर्कात
दीपक पवार, जितेंद्र शिंदे हे असल्यामुळे संघाच्या या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

आमदार शिंदे-निष्ठावंतांत अस्वस्थता
आमदार शिंदे यांनी सुनेत्रा शिंदे यांना राजकीय अडचणीत आणण्याची कोणतीच संधी सोडली नाही. एकदा त्यांच्या पतसंस्थेत विरोधी पॅनेल उभे करून आमदार शिंदे यांनी टोकाचा विरोध दर्शविला होता. तर त्यांच्यामुळेच सुनेत्रा शिंदे यांच्या जिल्हा सोसायटी मतदारसंघ गमवावा लागला आहे. मात्र, बँकेचा हक्काचा कारखाना निवडणुकीसह खरेदी-विक्री संघात आमदार शिंदे यांनी अधिक लक्ष घालून सुनेत्रा शिंदे गटाला जी मदत सुरू केली आहे, त्यामुळे निष्ठावंत व आमदार शिंदे समर्थकांच्यात कमालीची अस्वस्थता पसरलेली पाहायला मिळत आहे.

Web Title: Voters' rides in 'buy and sell'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.