साताऱ्यात येत्या मंगळवारी मतदान यंत्र प्रेत यात्रा
By नितीन काळेल | Published: January 20, 2024 06:55 PM2024-01-20T18:55:54+5:302024-01-20T18:56:15+5:30
सातारा : मतदान यंत्रावर भारतीय जनतेचा विश्वास राहिलेला नाही. यासाठी परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने मतदान यंत्र हटाव आंदोलन सुरू आहे. साताऱ्यातही ...
सातारा : मतदान यंत्रावर भारतीय जनतेचा विश्वास राहिलेला नाही. यासाठी परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने मतदान यंत्र हटाव आंदोलन सुरू आहे. साताऱ्यातही मंगळवारी (दि. २३) ईव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने मतदान यंत्र प्रेत यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी केले आहे.
सातारा येथे आयाेजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील भानू प्रतापसिंग आणि इतर वकिलांनी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी मतदान यंत्र हॅक करता येते हे सिध्द करुन दाखवलेले आहे. यामुळे भारतीय संविधान, लोकशाही प्रक्रिया, निवडणूक आयोग हे सर्वच निकालात निघाले आहेत. तर कोट्यवधी मतदारांच्या मताची चोरी होत असून ती सर्वांच्या समोर होत आहे. जनतेचा आता मतदान यंत्र मशीनवर विश्वास राहिलेला नाही. कारण, १८ लाख ९४ हजार मशीन गायब आहे. तर १७ लाख ६ हजार मशीन खराब आहेत. या गायब आणि खराब मशीनबाबत निवडणूक आयोगही बोलत नाही. यासाठी पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांवरच निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी देशातून होत आहे. आताही साताऱ्यात आंदोलन होत आहे.
मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी साताऱ्यातील राजवाडा येथून सकाळी १० ला मतदान यंत्र प्रेतयात्रा निघणार आहे. शांततेच्या मार्गाने ही यात्रा जिल्हाधकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी माने यांनी केले.
विविध पक्षांचा पाठिंबा..
साताऱ्यात मंगळवारी होणाऱ्या मतदान यंत्र हटाव आंदोलनाला राष्ट्रीय काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरवादी पक्षांनीही पाठिंबा दिल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.