नवस फेडण्यासाठी व्याघ्ररूप
By admin | Published: November 2, 2014 09:09 PM2014-11-02T21:09:32+5:302014-11-02T23:31:54+5:30
तयारी मोहरमची : मानवी वाघ रंगविण्याची कष्टसाध्य कला साताऱ्यात आजही टिकून
सातारा : मनोकामना पूर्ण होण्यासाठी नाना प्रकारचे नवस बोलले जातात आणि पूर्ण झाल्यावर ते फेडलेही जातात. अशीच मनोकामना मोहरम महिन्यातही केली जाते. ही मनोकामनाचा (नवस) म्हणजे मानवी वाघ होऊन ताबुताचे दर्शन घेऊन नवस फेडण्याची प्रथा आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून मानवी वाघ रंगविण्यात येत आहेत. रंगकामावर हात बसलेल्यांचीही कसोटी पाहणारा हा कलाप्रकार साताऱ्यात अजूनही पहावयास मिळत आहे.
मोहरमचा हा चिरपरीचित वाघ कसा बनवतात याचा ‘लोकमत’ने वेध घेतला असता मनोरंजक माहिती पुढे आली. मानवी वाघ बनविण्यासाठी मातीच्या चार रंगाचा वापर केला जातो, हे रंग फक्त पुण्यामध्येच मिळतात. रंगकाम करण्याआदी हे रंग दोन दिवस पाण्यात भिजवत ठेवावे लागतात.
साधारणत: पिवळा, लाल, काळा आणि सोनेरी रंगांने हे मानवी वाघ रंगविले जातात. मोहरमला नव्या दिवशी म्हणजेच ‘कत्तल की रात’ला हे मानवी वाघ नवस फेडायला निघतात. सकाळपासूनच रंगारी हे रंग लावण्यास सुरुवात करतात.
सर्व प्रथम पिवळा रंग संपूर्ण शरीरावर लावला जातो. हा रंग वाळून झाल्यावर पुन्हा एक हात पिवळा रंगाचा दिला जातो. त्यानंतर काळ्या रंगाने पट्टे ओढले जातात. व त्या पट्ट्यामध्ये लाल रंग भरला जातो. तर संपूर्ण छातीवर सोनेरी रंग लावला जातो. तर वाघासारखा चेहरा दिसण्यासाठी खास पेंटरकडून चेहरा रंगविला जातो. अशा प्रकारे एक वाघ रंगविण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. हा मोहरम पाहण्यासाठी शहरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येन सहभागी होतात. (प्रतिनिधी)
वाघाची शेपूट गायब
गेल्या काही वर्षांपूर्वी प्रत्येक वाघाला लाकडी शेपूट लावली जायची लाकडाला पांढऱ्या कपडाची गुंडाळी करून रंगवायचे व ही शेपूट वाघाच्या मागे बाधांयची. ही शेपूट संपूर्ण मिरवणुकीत दुसरी व्यक्ती धरण्याचे काम करीत होती. मात्र, आता शेपटाला कात्री लागली आहे. आताचे वाघ शेपटीविना दिसतात.
नवसाचा वाघ
ज्या दाम्पत्यांना अपत्ये होत नाही, अशी दाम्पत्य मुलगा व्हावा म्हणून नवस बोलण्याची प्रथा आहे. इच्छा पूर्ण झाली की, मग मुलाला किंवा मुलाचे वडील मोहरममध्ये वाघ होतात.