वडगाव हवेली-दुशेरे गट ठरतो ‘किंगमेकर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:22+5:302021-05-31T04:28:22+5:30

वडगाव हवेली : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. सहकार, संस्थापक ...

Wadgaon Haveli-Dushere group becomes 'Kingmaker'! | वडगाव हवेली-दुशेरे गट ठरतो ‘किंगमेकर’!

वडगाव हवेली-दुशेरे गट ठरतो ‘किंगमेकर’!

Next

वडगाव हवेली : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. सहकार, संस्थापक आणि रयत पॅनल अशी तिरंगी लढत होईल, असे संकेत आहेत. मात्र, काहीही झाले तरी ‘कृष्णा’च्या निवडणुकीत वडगाव हवेली-दुशेरे गट नेहमीच ‘किंगमेकर’ ठरतो, हा इतिहास आहे.

रेठरे बुद्रूक येथे १९५५ साली स्थापन झालेल्या कृष्णा कारखान्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये वडगाव हवेली व परिसरातील गावे निर्णायक ठरली आहेत. कारखाना स्थापनेत माजी मंत्री दिवंगत डी. एस. उर्फ दादासाहेब जगताप व दिनकरराव जगताप यांचा मोलाचा वाटा होता. कारखान्याच्या पहिल्या संचालक मंडळात दादासाहेब जगताप उपाध्यक्ष होते. त्यानंतर कारखान्यामध्ये राजकीय स्थित्यंतरे घडत गेली. प्रत्येक वेळी वडगाव हवेली गावाचा वरचष्मा राहिल्याचे दिसून येते. या गटातून दिवंगत दादासाहेब जगताप, दिनकरराव जगताप, जयवंत कृष्णा जगताप, सुशीला गणपती जगताप, अशोक जगताप याबरोबरच दादासाहेब जगताप यांच्यानंतर जगदीश जगताप यांना उपाध्यक्ष होण्याचा व सुमारे दोन दशके संचालक कार्यकाळ लाभला आहे. कारखाना स्थापनेपासून दादासाहेब जगताप, दिनकरराव जगताप व जगदीश जगताप यांनी नेहमीच यशवंतराव मोहिते गटाच्या नेतृत्वाखाली काम केले. २०१४च्या कारखाना निवडणुकीत राजकीय उलथापालथ होऊन जगदीश जगताप यांनी मोहिते गटाशी फारकत घेत भोसले गटात प्रवेश करून सत्तांतर घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. सप्टेंबर २०१८ साली कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली.

जगदीश जगताप यांची गेली दोन दशके कारखान्याशी नाळ जोडली असल्याने व चार वर्षे कारखान्याचे उपाध्यक्ष असल्याने कारखाना कार्यक्षेत्रात त्यांचे वेगळे वलय आहे. सध्याची राजकीय समीकरणे लक्षात घेता इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चा होत असताना येथील दोन राजकीय गटात संभ्रम पाहावयास मिळत आहे. विद्यमान संचालक अशोक जगताप गत दोन पंचवार्षिक निवडणुकीत संचालक राहून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर डॉ. सुधीर जगताप हे वैद्यकीय व्यावसायिक असून, त्यांचा या परिसरात मोठा संपर्क आहे. तसेच धोंडीराम जाधव हेही विद्यमान संचालक असून, त्यांचाही परिसरात मोठा जनसंपर्क आहे.

सध्या वडगाव हवेली ग्रामपंचायत जगदीश जगताप यांच्या विरोधी गटाकडे आहे. कारखाना निवडणुकीत अशोक जगताप व सुधीर जगताप यांना याचा फायदा होणार का? हे पहायला मिळेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, बैठका, दौरे यावर निर्बंध असताना आपापल्या पद्धतीने उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद या निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल देणार हे पहावे लागेल.

- चौकट

गटातून आजअखेर १५ अर्ज दाखल

वडगाव हवेली-दुशेरे गटातून विद्यमान उपाध्यक्ष जगदीश जगताप, धोंडीराम जाधव, डॉ. सुधीर जगताप, विद्यमान संचालक अशोक जगताप, बाबूराव जाधव, श्रीरंग देसाई, विलास पाटील, राजेंद्र चव्हाण, विठ्ठल पाटील, जयवंत गरुड, किसन देसाई, आनंदा जगताप, आत्माराम देसाई, सुहास जगताप, अभिजित जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: Wadgaon Haveli-Dushere group becomes 'Kingmaker'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.