वडूज : कचरा डेपो स्थलांतरासाठी रास्ता रोको तासभर वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:44 PM2018-09-29T17:44:05+5:302018-09-29T17:44:18+5:30
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको
वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको केला. आठवडा बाजारादिवशीच आंदोलन झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली.
कचरा डेपोसंदर्भात आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांसह संबंधित विभागाला कचरा डेपो स्थलांतराबाबत निवेदन दिले होते. परंतु याबाबतीत गंभीर नसलेल्या प्रशासनाने डोळेझाक करत हा प्रश्न सोयीस्कररीत्या बाजूला ठेवला. वडूजनगरीच्या वसाहतीत झपाट्याने वाढ होत असली तरी नगरपंचायत याबाबतीत गंभीर नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
नागरीवस्ती झपाट्याने वाढत असल्याने कचºयाचीही वाढ तेवढ्या गतीने होत आहे. लक्षात घेता सद्य:स्थितीतील कचरा डेपोत कचºयाची होणारी भरमसाठ वाढ, त्या परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. कचराच्या दुर्गंधीबरोबरीनेच सातत्याने कचरा पेटविल्याने होणारे हवा प्रदूषण या सर्वच गोष्टींचा येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. हा कचरा वसाहत परिसरातही दिसून येत आहे.
कचरा डेपो लगतच विविध समाज बांधवांच्या स्मशानभूमी असल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत. तरीही नगरपंचायत प्रशासन याबाबत विचाराधीन नाही, ही शोकांतिका ठरत आहे, असा नागरिकांमधून सूर निघत आहे. या संदर्भात स्वच्छता मंत्री, जिल्हाधिकारी, वडूज नगरपंचायत, पोलीस ठाणे आदींना निवेदन दिलेले होते.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कचरा डेपो स्थलांतराबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे लक्षात येताच भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व या परिसरातील नागरिकांनी वडूजमधील शेतकरी चौकात एक तास रास्ता रोको केला.
स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत..
सातारा जिल्हा स्वच्छतेबाबत देशात प्रथम क्रमांक मिळवला म्हणून एकीकडे आनंदोत्सव साजरा करताना दिसून येत आहे. दुसरीकडे हुतात्म्यांच्या भूमी व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजनगरीत कचरा निर्मूलनाबाबत नगरपंचायत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ वडूजसाठीही प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.