वाघोशी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:05+5:302021-01-09T04:32:05+5:30
आदर्की : गावात असलेली राजकीय फळी, घरात असणारे मतभेद, दुभंगलेली मने जुळविण्यासाठी फलटण तालुक्यातील वाघोशी गावातील तरुण वर्ग, बाहेरगावी ...
आदर्की : गावात असलेली राजकीय फळी, घरात असणारे मतभेद, दुभंगलेली मने जुळविण्यासाठी फलटण तालुक्यातील वाघोशी गावातील तरुण वर्ग, बाहेरगावी असणारे चाकरमानी यांनी वैचारिक मतभेद विसरून विचारांची बैठक घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने, त्यांचे कौतुक होत आहे.
फलटण तालुक्यातील वाघोशी येथील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. गावात बैठका सुरू झाल्या. उमेदवार शोधाशोध सुरू झाली; पण शासनाने सरपंच आरक्षण निवडणुका झाल्यानंतर होणार असल्याचे जाहीर केले.
बाहेरगावी असलेली चाकरमानी व गावातील तरुण यांनी विचारांची देवाण-घेवाण करून गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी कंबर कसली. रात्रं-दिवस बैठका घेऊन सर्वांच्यामते उमेदवार निवड करून सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये ताराचंद उत्तम पवार, अंकुश रामचंद्र शिंदे, लक्ष्मण मारुती जाधव, भारती महादेव पवार, प्रभावती पांडुरंग पवार, सविता दीपक सुतार, सुजाता हणुमंत गोरे हे सदस्य बिनविरोध निवडले.
बिनविरोध निवडीनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व तरुण मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.
०८आदर्की
फोटो : वाघोशी (ता. फलटण) ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या सदस्यांचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.