एसटी कर्मचाऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालतोय ‘बावधनचा बाबा’, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 02:32 PM2022-01-01T14:32:16+5:302022-01-01T14:32:38+5:30
शासन एसटीचं विलीनीकरण करत नाही... कामावर जायचंय पण, सहकारी काय म्हणतील या विचारात अडकल्याने कर्मचाऱ्यांत काहीशी निराशा दिसत असताना वाई आगारातील वाहक नारायण मांढरे सोशल मीडियाच्या माध्यमातून गाणी बनवून सहकाऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालत आहेत.
जगदीश कोष्टी
सातारा : शासन एसटीचं विलीनीकरण करत नाही... कामावर जायचंय पण, सहकारी काय म्हणतील या विचारात अडकल्याने कर्मचाऱ्यांत काहीशी निराशा दिसत असताना वाई आगारातील वाहक नारायण मांढरे सोशल मीडियाच्या माध्यमातून गाणी बनवून सहकाऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालत आहेत. ते सोशल मीडियात ‘बावधनचा बाबा’ या नावाने ओळखले जातात.
एसटी संपाच्या निराशादायी वातावरणातही काहीजण आनंद वाटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच ते सर्वत्र कायम चर्चेत राहतात. नारायण मांढरे त्यापैकीच एक. नारायण मांढरे हे राज्य परिवहन महामंडळाच्या वाई आगारात २००९ मध्ये वाहकपदी भरती झाले. त्यांना महाविद्यालयीन जीवनापासून नृत्य, कला, क्रीडा क्षेत्राविषयी भलतीच आवड होती. वाईच्या किसन वीर महाविद्यालयात भरत असलेल्या स्नेहसंमेलनात ते हिरीरीने सहभागी होत. महाविद्यालयीन शिक्षण संपले, एसटीत नोकरीला लागले पण, त्यांनी स्वत:मधील तरुण रसिक, कलाकार संपू दिला नाही.
याच दरम्यान सोशल मीडियाची क्रांती झाली अन् टिकटॉक सुरू झाला. एसटीत काम असल्याने मांढरे यांचे नेहमीच विविध भागात जाणे होते. तेथे गेल्यावर वातावरण पाहून त्यांना स्वत:चा व्हिडिओ बनविण्याचा मूड येतो. त्यातूनच छोटे छोटे व्हिडिओ गाण्यांच्या तालावर नृत्य केलेले बनविले आहेत. यातील बहुतांश गाणी जुनी, अर्थबोध होतील अशा स्वरुपाची आहेत. सोशल मीडियावर ती भलतीच व्हायरल झाली आहेत. ती पाहिल्यानंतर अनेक लोक फोन करुन अभिप्राय नोंदवत असतात.
एसटीच साक्षीदार...
- नारायण मांढरे हे सोशल मीडियावर ‘बावधनचा बाबा’ या नावाने परिचित आहेत.
- त्यांच्या गाण्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश गाण्यांमध्ये ते एसटी वाहकाच्या खाकी गणवेशात दिसतात.
- अन् त्यांच्या पाठीमागे एसटी दिसत असते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या काळजात ते घर करत आहेत.
- इन्स्टाग्रामवर तीन हजार, फेसबुक रिल्सवर पंधरा हजारांहून अधिक लोक व्हिडिओ पाहतात