वाई भूमि-अभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपिकास चार वर्षे शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:52 AM2021-02-27T04:52:32+5:302021-02-27T04:52:32+5:30

सातारा : फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी १२ हजार रुपये लाचेची मागणी करून १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाईतील ...

Wai land-records office corrupt clerk sentenced to four years | वाई भूमि-अभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपिकास चार वर्षे शिक्षा

वाई भूमि-अभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपिकास चार वर्षे शिक्षा

Next

सातारा : फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी १२ हजार रुपये लाचेची मागणी करून १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाईतील भूमि-अभिलेख कार्यालयातील लिपिक कृष्णात यशवंत मुळीक (वय ४७, रा. जेजुरीकर काॅलनी, सिद्धनाथवाडी, वाई) याला जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे कोंडवे (ता. सातारा) येथील एका गटातील फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे लिपिक कृष्णात मुळीक यांनी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांची बदली अभिलेख कार्यालय वाई मोजणी खाते, वर्ग ३ येथे झाली असल्याचे सांगितले. तसेच नकाशाची नक्कल हवी असल्यास वाई येथे येऊन पैसे देऊन जाण्यास सांगितले. पैशाची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात जाऊन भूमि-अभिलेख कार्यालय वाई येथील कृष्णात मुळीक या लिपिकाविरुध्द तक्रार दिली.

त्यावेळी तक्रारदार यांनी सातारा एसीबीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीहरी पाटील यांना भेटून तक्रार अर्ज दिला.

एसीबी विभागात मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यास सुरुवात केली, त्यावेळी तडजोडीअंती १० हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम १ सप्टेंबर २०१४ रोजी वाई - सातारा रोडवरील एका रुग्णालयाच्या पाठीमागे कारमध्ये बसून त्याने स्वीकारली. यावेळी एसीबी विभागाने रंगेहात त्याला पकडले. ही कारवाई झाल्यानंतर एसीबीने त्याच्याविरोधात वाई पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला.

या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी केला. जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर बचाव व सरकार पक्षाच्यावतीने युक्तिवाद झाला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कृष्णात मुळीक याला चार वर्षे शिक्षा सुनावली.

सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. लक्ष्मण खाडे यांनी काम पाहिले.

Web Title: Wai land-records office corrupt clerk sentenced to four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.