वाई नगर परिषदेची फरते पथक मोहीम यशस्वी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:52+5:302021-08-02T04:14:52+5:30
वाई : कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व वाई शहरातील बाजारपेठेत तसेच मुख्य ठिकाणी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांची ...
वाई : कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व वाई शहरातील बाजारपेठेत तसेच मुख्य ठिकाणी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांची जागेवरच कोरोना फिरत्या पथकाद्वारे कोरोना तपासणी केली जात आहे. पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी केली जाते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशांनुसार शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक बाबींची तसेच इतरही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी आहे. याबाबतची नियमावलीदेखील जाहीर करण्यात आलेली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या सर्वांसाठीच वाई नगर परिषद, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे मोहीम सुरू करण्यात आली होती. संपूर्ण महिन्यात रॅट आणि आरटीपीसीआर मिळून एकूण २ हजार सहाशेच्या वर टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २६ जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आढळले आहेत.
या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्केटमधील कोरोना प्रसार टाळण्यासाठी नगर परिषदेकडून जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे व चाचणी करून पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना थेट कोविड केअर सेंटर येथे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे सुपर स्प्रेडर्सकडून होणारा कोरोनाचा प्रसार वेळीच रोखण्यात प्रशासनाला मदत होत आहे. ही मोहीम राबविताना प्रामुख्याने ज्या प्रभागामध्ये सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे, अशा प्रभागामध्ये प्राधान्याने चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे वेळीच कोरोनाबाधित रुग्णांना योग्य तो औषधोपचार मिळाल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अटकाव होत आहे. वाई नगर परिषदेच्या फिरते पथक या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटण्यास मोठी मदत झालेली आहे. फिरते पथक या मोहिमेला शहरातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला असून, यापुढेही वाई शहरात ही मोहीम अशीच चालू राहणार आहे.
(कोट..)
शहरात कोणत्याही कारणाने
येणाऱ्या नागरिकांनी तसेच खेडोपाड्यातील लोकांनी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनीच सर्वतोपरी प्रयत्न
करणे आवश्यक आहे. त्यामुळे मार्केट उघडले असले तरी कोरोनाविषयक नियमांच्या पालनात कोणताही हलगर्जीपणा करू नये.
-विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी