वाईकरांनी कोल्हापूरच्या संघर्षाचा आदर्श घ्यावा !
By admin | Published: January 8, 2016 11:27 PM2016-01-08T23:27:20+5:302016-01-09T00:26:30+5:30
भाजी मंडईत निषेध सभा : विकास आराखड्याच्या विरोधात शंभर टक्के कडकडीत बंद
वाई : ‘वाई नगपालिकेने सुधारित विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून हरकती घेण्याचे काम सुरू आहे़ हरकती देण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी वाई संघर्ष समितीने नागरिकांना बंदची हाक दिली होती़ त्याला वाईकर नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला़ दरम्यान, भाजी मंडईत झालेल्या निषेध सभेत वाईकरांनी कोल्हापूर येथील नागरिकांच्या संघर्षाचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन संघर्ष समितीचे काशिनाथ शेलार यांनी केले़
संपूर्ण दिवस कडकडीत बंद पाळल्यानतंर वाईच्या भाजी मंडईत संघर्ष समिती व वाईकर नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष विवेक पटवर्धन, श्रीकांत चव्हाण, अजित वनारसे, अनिल सावंत, सचिन फरांदे, महेंद्र धनवे, धनंजय मोरे, किरण खामकर, संजय गायकवाड, कैलास जमदाडे, विश्वास सोनावणे, विराज शिंदे, शिवाजीराव जगताप, विजयाताई भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती़
शेलार म्हणाले, ‘आधी पालिकेने हद्दवाढ करावी व नतंरच नवीन आरक्षण आराखडा तयार करण्यात यावा़ यशवंतनगर ग्रामपंचायत व शहाबाग यांना पालिकेच्या हद्दीत सामावून घ्यावे तर आरक्षणाचे चित्र बदलेल़ १९८५ मध्ये जो आराखडा तयार करण्यात आला, तो त्यावेळचा लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला होता़ सध्याची वाई शहराची लोकसंख्या दुप्पटीने वाढली असताना त्याच आराखड्याची अंमलबजावणी करणे हे पूर्णपणे चुकीचे असून, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही़ शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्यासाठी पालिकेकडे आरक्षित जागा नाही, याच्या इतकी दुसरी दुर्दैवाची बाब नाही़
सध्याचा विकास आराखडा हा पक्षपातीपणाचा असून,
विशेष सर्वसाधारण सभेत पालिकेच्या सर्व नगरसेवकांनी याला कडाडून विरोध करून शासनाला विरोध झालेला आराखडा पाठविण्यात यावा, तरच जनतेच्या पाठीमागे नगरसेवक आहे, असे मानावे लागेल़ (प्रतिनिधी)
निषेधाचा ठराव मंजूर
वाईत शुक्रवारी शंभर टक्के बंद असताना विद्यमान नगराध्यक्षांचे देशीदारूचे दुकान व विद्यमान सदस्या शर्मिला जाधव यांचे हॉटेल राजरोस सुरू ठेवल्याने संघर्ष समितीचे सचिन फरांदे यांनी सभेत निषेध ठराव मांडला़
आरक्षण विरोधात घेतल्या जाणाऱ्या हरकती हा निव्वळ फार्स असून, विकास आराखड्याची अंमलबजावणी प्रक्रिया पालिकेच्या अखत्यारीत राहिली नसून राज्याच्या नगरविकास मंत्र्यांकडे हा प्रस्ताव गेला आहे़ वाई विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे़ वाईकरांना आपला विरोध नगरविकास मंत्रालयाकडे नोंदवावा लागणार आहे.
- श्रीकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष, वाई पालिका