कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जनाकडे वाईकरांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:05+5:302021-09-22T04:44:05+5:30
वाई : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, शहरातील सर्व घाटांवर घरगुती व सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन पालिकेने ...
वाई : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, शहरातील सर्व घाटांवर घरगुती व सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तळ्यातच करा, अन्यथा कारवाईचा इशारा देऊनही वाईकर नागरिकांनी कृष्णा नदीतच गणेश विसर्जन करण्याला पसंती दिली. प्रत्येक घाटावर निर्माल्य टाकण्यासाठी कुंड ठेवण्यात आले असताना, लोकांनी मूर्तीच्या अंगावरील निर्माल्य नदीतच टाकले.
वाईमधील प्रभागात गणेश विसर्जनासाठी दहा गणेश रथ तयार केले होते. त्या रथाकडे गणेश भक्त आलेच नाहीत. घरगुती गणेश मूर्ती लोकांनी चालतच नेणे पसंत केले. प्रभागनिहाय गणेशमूर्ती स्वीकारून नगरपालिकेच्यावतीने कृत्रिम तळ्यात विधिवत विसर्जन करण्यात येणार होते, मात्र नागरिकांनी पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. अतिशय कमी लोकांनी पालिकेकडे गणेश मूर्ती स्वाधीन केल्या. कोरोनाची कसलीही भीती गणेश भक्तांना नसल्याचे प्रामुख्याने दिसून येत होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून पालिकेच्यावतीने खबरदारी घेण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना गेली अनेक वर्षे पालिका विविध संघटनांच्या माध्यमातून राबवत आहे. त्याच धर्तीवर यंदाही नदीपात्रात विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.
कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव रोखण्यासाठीही पालिका काळजी घेत आहे. विसर्जनासाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये व्यवस्था केली होती. या मूर्तींचे पालिकेच्यावतीने विधीवत व योग्य पावित्र्य राखून विसर्जन केले जाणार आहे. ज्यांना घरी शक्य आहे त्यांनी घरीच विसर्जन करावे व ज्यांना घरी शक्य नाही, त्यांनी गणेश मूर्ती पालिकेकडे दान करून सहकार्य करावे, अशी विनंती मुख्याधिकारी किरण मोरे, नगराध्यक्षा डॉ. अनिल सावंत व सर्व नगरसेवकांनी केली.
वाई शहरातील गणेश मंडळांनी मिरवणुका न काढता गणपतीसमोरील मूर्तीचे विसर्जन सध्या पद्धतीने करण्यात धन्यता मानली. मनाच्या गणपतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून व्दारकेच्या गणपतीची भेट घेऊन विसर्जनाची सांगता पारंपरिक पद्धतीने केली. शहरातून मोठ्या मिरवणुका निघाल्या नाहीत.
चौकट
कृत्रिम तळ्यातच सक्ती करावी
नदी पात्रात भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केल्याने पालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर वाईकर नागरिकांचा विश्वास नसल्याचे अधोरेखित झाले आहे, परंतु कृष्णेचे पावित्र्य राखणे एकट्या पालिकेची या काही ठराविक सामाजिक संस्थांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. याचे भान ठेवून गणेश मूर्ती पालिकेस दान कराव्यात. तसे न झाल्यास पोलिसांची मदत घेऊन भाविकांना दान देण्याची सक्ती करण्याची गरज आहे.