चिमुकली पाहतेय वाट; आई-बाबा कोरोना लढ्यात; घरदार सोडून, नात्याची माणस सोडून कर्तव्य बजवावे लागतय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:37 AM2020-04-29T11:37:45+5:302020-04-29T11:38:12+5:30
आजीबरोबर पूर्वा गावी गेली. हे दाम्पत्य आपले ह्यकर्तव्यह्ण बजावू लागले. ड्यूटीवरून घरी आले की पूर्वाच्या आठवणीने व्याकूळ झालेले हे दाम्पत्य व्हिडीओ कॉलवरून तिच्याशी बोलते. त्यावेळी ती आई... बाबा... म्हणून हाका मारते आणि या दोघांतील खाकी वर्दीतील अधिकारी गायब होऊन त्यांच्यातील आई, बाबा जागा होतो. त्यावेळी दोघेही भावनिक होतात.
अजय जाधव ।
उंब्रज : ती दीड वर्षांची चिमुकली. आई व वडील दोघेही मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून ते दोघेही ड्यूटीवर. एकीकडे ह्यकर्तव्यह्ण आणि दुसऱ्या बाजूला लेकीची माया व प्रेम. अशा द्विधा अवस्थेत या खाकी वर्दीतील दाम्पत्याने कर्तव्याला प्राधान्य दिले. स्वत:च्या मुलीला तिच्या आजीकडे सोडून हे दाम्पत्य सध्या कोरोना लढ्यात कार्यरत आहे.
क-हाड तालुक्यातील वाठार येथील सारिका देसाई यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न शिराळा तालुक्यातील ढोलेवाडीमधील पोलीस उपनिरीक्षक महेश नायकवडी यांच्याबरोबर झाले. दोघेही मुंबई पोलीस दलात सेवेत आहेत. सारिका या धारावी पोलीस ठाण्यात तर महेश हे डोंबिवली पोलीस ठाण्यात. या दाम्पत्याला दीड वर्षाची पूर्वा ही कन्या. दोघांची पोलीस ठाणे वेगवेगळी.
घरी पूर्वा आजीबरोबर राहत होती. ड्यूटीवरून हे दोघे घरी आले की पूर्वा दोघांना सोडत नव्हती. दीड वर्षाच्या लेकीचा लळा लागल्यामुळे दोघेही ड्यूटी कधी संपते, घरी जावुन तिला कधी भेटतोय, याची वाट पाहायचे. असे असतानाच कोरोनाचे संकट आले. या दाम्पत्याला दीड वर्षाच्या लेकीला गावी पाठवण्याचा निर्णय काळजावर दगड ठेवून घेण्याची वेळ आली.
आजीबरोबर पूर्वा गावी गेली. हे दाम्पत्य आपले ह्यकर्तव्यह्ण बजावू लागले. ड्यूटीवरून घरी आले की पूर्वाच्या आठवणीने व्याकूळ झालेले हे दाम्पत्य व्हिडीओ कॉलवरून तिच्याशी बोलते. त्यावेळी ती आई... बाबा... म्हणून हाका मारते आणि या दोघांतील खाकी वर्दीतील अधिकारी गायब होऊन त्यांच्यातील आई, बाबा जागा होतो. त्यावेळी दोघेही भावनिक होतात. आई-बाबाला पाहून ती चिमुकली फोनवर त्यांना बिलगण्याचा प्रयत्न करू लागली की, या दोघांच्या भावना अनावर होतात. लेकीने आई बाबांचा जोसरा काढला तर..? ती आजारी पडली तर..? हे प्रश्न त्यांना सतावू लागले. यामुळे हल्ली हे दोघेही तिच्याबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलणेही टाळू लागले आहेत.
त्यांचं दु:ख समजून घ्या!
या पोलीस अधिकारी दाम्पत्यासारखे कित्तेक अधिकारी, कर्मचारी आपल्या मुलांपासून लांब राहून कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी स्वत:ला झोकून देत आपले कर्तव्य बजावत आहे. त्यांना वेळप्रसंगी कठोर पावले उचलावी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांच्यात चिडचिड होत आहे. त्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र प्रयत्न करणा-या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:चे घरदार सोडून, नात्याची माणस सोडून कर्तव्य बजवावे लागत आहे.