वडूज नगरपंचायतीला गृहप्रवेशाची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:09+5:302021-08-12T04:44:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराला नगरपंचायतीचे स्वरूप प्राप्त होऊन साडेचार वर्षे लोटली. मात्र, आजपर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराला नगरपंचायतीचे स्वरूप प्राप्त होऊन साडेचार वर्षे लोटली. मात्र, आजपर्यंत नगरपंचायतीला प्रशस्त इमारत काही मिळाली नाही. येथील तहसील कार्यालय नूतन प्रशासकीय इमारत स्थलांतरित झाल्यानंतर तहसील कार्यालयाची दगडी बांधकाम असलेली भव्य इमारत धूळखात पडून आहे. ही इमारत नगरपंचायतीसाठी मिळावी, हे वडूजकरांचे स्वप्न अजूनही अपुरेच आहे.
शहरातील मुख्य आणि भव्य जागेत २ सप्टेंबर १९६८ साली १ हजार ७४९ चौरस मीटर इतकी भव्यदिव्य दगडी इमारत बांधण्यात आली. ही इमारती आजअखेर सुस्थितीत आहे. इमारतीच्या समोर आणि अवतीभवती असलेली मोकळी जागाही वापराविना पडून आहे. येथील भूमिपुत्रांनी कवडीमोल दराने ही मुख्य जागा शासनाला हस्तांतरित केली. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या इमारतीचे दिमाखात उद्घाटन झाल्याचे वडूजकरांना ज्ञात आहे. यापूर्वी या इमारतीत तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, उपकोषागार कार्यालय, निवडणूक शाखा विभाग, रेव्हेन्यू क्लब आदींसह महसूल विभागांतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज चालत होते; परंतु काही वर्षांपूर्वीच सुसज्ज असलेल्या प्रशासकीय इमारतीत सर्वप्रथम तहसील कार्यालयाने आपले ठाण मांडले. यासाठी तत्कालीन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी समयतत्परता दाखवीत आपले कार्यालय तातडीने नव्या प्रशासकीय इमारतीत स्थानापन्न केले. मात्र, तहसील कार्यालयाची जुनी दगडी इमारत अक्षरक्ष: वास्तव्याविना धूळखात पडून आहे.
अडगळीत व पार्किंग व्यवस्था नसलेल्या इमारतीमध्ये सध्या नगरपंचायतीचे कार्यालयीन कामकाज सुरू आहे. यामुळे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिक कोंडी होत आहे. कोरोना काळात शहरातील नागरिकांना सुज्ञ करणारे नगरपंचायत प्रशासन मात्र कोरोनाला आव्हान देत उर्वरित व अंतिम काळातील कामकाजात व्यस्त आहे.
(चौकट)
..तर शहराच्या वैभवात भर
वडूज शहराची व्याप्ती पाहता दगडी इमारत व मोकळी जागा नगरपंचायत व शहराच्या वैभवात निश्चित भर टाकेल. या इमारतीत नगरपंचायतीने आपले बस्तान बांधले तर, या इमारतीमध्ये स्वतंत्र नगरपंचायतीचे विभाग तयार होऊन नागरिकांसह, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त होऊ शकतो, तसेच भव्य खुल्या जागेत नगरपंचायतीने विविध उपक्रम राबविल्यास उत्पन्नातही वाढ होऊ शकते. शहराच्या मध्यभागी असलेली ही इमारत सर्व सोयीयुक्त असल्याने व इमारतीच्या हाकेच्या अंतरावरच बसस्थानक, नूतन प्रशासकीय इमारत आणि नव्याने होत असलेली पोलीस ठाण्याची ग्रीन इमारतदेखील आहे. त्यामुळे नगरपंचायत जुन्या तहसील कार्यलयात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
(चौकट)
आता नाही येणे-जाणे.....!
वडूज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी दिग्गजांसह नेतेमंडळींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील व्यक्तीला जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य म्हणून मिरवता येणार नाही. त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी त्यांच्या हालचालींना वेग आला आहे. ही शेवटची नामी संधी लक्षात घेऊन आणि ‘आता नाही येणे-जाणे’ या अभंगाच्या ओवीचे महत्त्व समजून नगरपंचायत जुन्या तहसीलमध्ये स्थलांतरित करावी, असा सूर वडूजकरांमधून उमटत आहे.
फोटो : १० वडूज