भात लागणीसाठी रोप वाढीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:42+5:302021-06-25T04:27:42+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असून काही भागांतील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर भात लागण करण्यासाठी ...
कुडाळ : जावळी तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असून काही भागांतील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर भात लागण करण्यासाठी रोपांची वाढ होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
जावळी तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिके घेतली जातात. यामधील सर्वाधिक क्षेत्र हे भात पिकाखालील पाहायला मिळते. मागील काही दिवसांपूर्वी मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली. यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली. तसेच काही भागात खरीप पिकांच्या पेरण्याही पूर्ण होत आल्या आहेत. सद्य:स्थितीत तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त आहे.
जावळी तालुक्यात खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र १९५०० हेक्टर आहे. तालुक्यात प्रामुख्याने भात ८८०० हेक्टर, नाचणी ७१५ हेक्टर, सोयाबीन ३५००, भुईमूग ३ हजार हेक्टर व उर्वरित क्षेत्र कडधान्ये, मका, ज्वारी व गळीत धान्य पिकाखालील आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची जवळपास ८० टक्के पेरणी झालेली आहे. उगवणक्षमताही चांगली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात भात पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी भात लागणीसाठी तरवे टाकले असून अजूनही रोपांची पुरेशी वाढ झालेली नाही. येत्या काही दिवसांत रोपे लावणीयोग्य होतील.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\