कऱ्हाडच्या हिंदू मेळाव्यासाठी तीस हजार युुवकांची प्रतिक्षा
By admin | Published: February 13, 2015 09:43 PM2015-02-13T21:43:52+5:302015-02-13T22:56:41+5:30
रस्त्यांवर खेळांचे सादरीकरण : कृष्णा घाटावर मंडपाची उभारणी
कऱ्हाड : ‘हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने येथील कृष्णामाई घाटावर उद्या, शनिवारी हिंदू युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास तीस हजारांहून अधिक युवक हजेरी लावतील,’ असा विश्वास संयोजन प्रमुख नगरसेवक विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला. हिंदू युवा मेळाव्यास कऱ्हाड पाटण तालुक्यातून मोठ्या संख्येने युवक उपस्थिती लावणार आहेत. मेळाव्यानिमित्त कऱ्हाड शहरात मुख्य रस्त्यासह ठिकठिकाणी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गुरुवारी रात्री नगरपालिकेकडून स्वच्छता करण्यात आली असून, कृष्णामाई घाट येथे भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. मेळाव्यामध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून युवकांतर्फे विविध खेळांचे सादरीकरण केले जाणार आहे. मेळाव्यास भाग्यनगर हैद्राबाद येथील आमदार व गोरक्षा दलाचे प्रमुख ठाकूर राजसिंग-राजाभैय्या हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर खासदार संजय पाटील, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर व हिंंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे उपस्थित राहणार आहेत. हिंदू युवा मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने कऱ्हाडसह परिसरातील युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण कऱ्हाडचे अध्यक्ष भूषण जगताप, उत्तर कऱ्हाडचे अध्यक्ष महेश जाधव, मलकापूर शाखेचे अध्यक्ष राहुल यादव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)