गावाच्या उजेडासाठी झिजले वीजखांब!
By admin | Published: July 25, 2015 11:53 PM2015-07-25T23:53:19+5:302015-07-26T00:02:13+5:30
महावितरणचे धोक्याकडे दुर्लक्ष : वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोखंडी खांब गंजल्यामुळे धोकादायक स्थितीत उभे
संजीव वरे ल्ल वाई
स्वत: अंधारात राहून इतरांना उजेड देऊन त्यांचं आयुष्य प्रकाशमान करणारे गावोगावचे वीजखांब आता म्हातारे होऊ लागले आहेत. ज्याच्या खांद्यावर बसून वीज गावात आली ते विजेचे खांब वर्षानुवर्षे ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत उभे आहेत. मात्र, त्यांचं आयुष्यही आता संपत आले असून वाई तालुक्यातील वयगाव येथे विजेचे नऊ लोखंडी खांब अक्षरश: कुजून मोडकळीस आले आहेत. गावाला उजेड देता-देता वीजखांब अक्षरश: झिजले आहेत. ही धोक्याची घंटा असून वीजखांबाच्या या दुखण्याकडं वीजवितरण कंपनीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
वाई तालुक्यातील वयगाव या गावात १९७९ मध्ये वीज आली. त्यावेळी गावात लोखंडी वीजखांब रोवून वीजपुरवठ्याची सोय केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे ३५ वर्षांपासून ते खांब गावाला उजेड देण्याचे काम करत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे ऊन, वारा अन् पावसाचा मारा सहन करून लोखंडी खांबांना गंज चढला आहे. गावातील ९ लोखंडी वीजखांब गंजल्यामुळे झिजले आहेत. हे खांब लोकवस्तीत असून मोठ्या वादळवाऱ्यात कधीही जमीनदोस्त होऊ शकतात.
तालुक्यातील अनेक गावातील वीजखांबांची दुरवस्था झाली आहे. वीजखांबांना गंज चढून ते मोडकळीस आले आहेत. महावितरण कंपनीने धोकादायक वीजखांब बदलावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वायरमनच्याही जिवाला धोका
लोखंडी वीजखांब वर्षानुवर्षे पावसात भिजल्यामुळे गंजले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी खांबांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. अशा धोकादायक खांबावर दुरुस्तीसाठी चढणे जिवाशी खेळ आहे. जावळी तालुक्यातील आखाडे येथे शुक्रवारी तार ओढून घेण्यासाठी वीज तंत्रज्ञ खांबावर चढला असता, सिमेंटचा खांब तुटून झालेल्या दुर्घटनेत तंत्रज्ञाचा मृत्यू झाला होता.
वीजखांबांच्या दुखण्याला उपचाराची गरज
वाई तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये लोखंडी, सिमेंटचे वीजखांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. अशा वीजखांबांचा सर्व्हे करून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास वादळात दुर्घटना घडू शकते.