लेक चालली सासरला; घोड्यावरून श्रीवंदनाला !
By admin | Published: January 24, 2017 11:35 PM2017-01-24T23:35:51+5:302017-01-24T23:35:51+5:30
कवठे : ससाणे परिवाराकडून सावित्रीच्या लेकीचे घोड्यावरून देवदर्शन
कवठे : विवाह सोहळ्यावेळी प्रत्येक गावात नवरदेव घोड्यावरून श्रीवंदनाला जातो. मात्र, आपल्या लाडक्या लेकीचीही हौसमौज व्हावी व मुला एवढीच मुलगीही श्रेष्ठ आहे, हा संदेश समाजात पोहोचावा, यासाठी कवठे येथील ससाणे परिवाराने आपल्या लाडक्या लेकीचे श्रीवंदन चक्क घोड्यावरून केले.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. याचाच वसा घेऊन कवठे, ता. वाई येथील माळी समाजाची भारती व काशिनाथ ससाणे यांची लाडकी लेक दीपिकाने पदवी शिक्षण पूर्ण केले व तद्नंतर डी.एड पूर्ण केले. काशिनाथ ससाणे यांना दोन मुली व एक मुलगा. पैकी दीपिका हे शेंडफळ. घरातील सर्वांची लाडकी व घरातील शेवटच्याच मुलीचे आज लग्नकार्य. या सावित्रीच्या लेकीची पाठवणुकीत कोणतीही कसर न ठेवता धुमधडाक्यात श्रीवंदन करावयाचे असे ससाणे परिवाराने ठरवले. दीपिकाने मात्र आपले श्रीवंदन मिरवणूक ही मुलांच्या प्रमाणे घोड्यावरूनच झाली पाहिजे हा हट्ट धरला. या निमित्ताने हा क्रांतिकारक निर्णय लग्नानिमित्त बैठक बोलावून भावकीसमोर मांडला गेला. भावकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. पहिल्यांदाच गावात वधूचे अशा प्रकारे श्रीवंदन होत असल्याने सांगोपांग चर्चा घडली व भावकीने एकमुखाने या स्त्री हक्क समानतेच्या अनोख्या श्रीवंदनाला होकार दिला. बँडपथकाच्या तालावर दीपिका घोड्यावर विराजमान झाली. ‘जा जा मुली तू सासरी जा जा मुली,’ या गाण्याच्या सुरुवातीने श्रीवंदन सुरू झाले.
मुलाच्या श्रीवंदनासाठी मुलाच्या घोड्यापाठीमागे मिरवणुकीत सर्व उपस्थित राहतात. तसे उपस्थित राहून मिरवणूक यशस्वीरीत्या पूर्ण केली व आपल्या सावित्रीच्या लेकीचा हा हट्ट पुरविला. यामध्ये गावातील लोकही बहुसंख्येने उपस्थित राहून ससाणे या अनोख्या श्रीवंदनात सामील झाले होते. (वार्ताहर)
विवाह सोहळ्याचा थाट बदलतोय...!
विवाह सोहळ्याचा थाट बदलतोय. काही वर्षांपूर्वी विवाह सोहळा सुमारे पाच दिवसांचा असायचा. दळणवळणाच्या इतर सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील दळणवळणाचे एकमेव साधन असलेल्या बैलगाड्यांमधून वऱ्हाडी मंडळींना आणण्याची सोय असायची. पहिल्या दिवशी मूळ गावाहून निघायचे. उशिरा त्याठिकाणी पोहोचायचे. त्या रात्री वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हळद लावणे वगैरेचा कार्यक्रम व्हायचा. तिसऱ्या दिवशी देवक काढण्याचा कार्यक्रम तर चौथ्या दिवशी विवाहाचा विधी व त्यानंतर पाचव्या दिवशी पाठवणीचा दिवस. सध्या हा पाच दिवसांचा विवाह सोहळा काही तासांवरच येऊन ठेपला आहे.