वीस वर्षांपासून सातारा ते सज्जनगड पदभ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:55+5:302021-02-15T04:34:55+5:30
सातारा : निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला रममाण होता यावे यासाठी साताऱ्यातील भैरोबा डोंगरी ग्रुपच्या वतीने यंदाही सातारा ते सज्जनगड पदभ्रमंतीचे ...
सातारा : निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला रममाण होता यावे यासाठी साताऱ्यातील भैरोबा डोंगरी ग्रुपच्या वतीने यंदाही सातारा ते सज्जनगड पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. तब्बल वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा शहराला जैवविविधतेचा वारसा लाभला आहे. येथील वृक्ष-वेली, पशू-पक्षी पाहिल्यानंतर आपली वन व प्राणीसंपदा किती समृद्ध आहे, याची प्रचिती येते. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आज आपल्याला या निसर्गाकडे पाहण्यासही वेळच नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून साताऱ्यातील भैरोबा डोंगरी ग्रुप सातारा ते सज्जनगड पदभ्रमंतीचे आयोजन करीत आहे.
या ग्रुपच्या ४२ सदस्यांनी नुकतीच पदभ्रमंती पूर्ण केली. १६ वर्षांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांनी या पदभ्रमंतीत सहभाग नोंदविला. झाडाखाली थोडा विसावा घेत, गप्पा-गोष्टी करत आबालवृद्धांनी सातारा ते सज्जनगड हे १५ किलोमीटरचे अंतर पाच तासात पूर्ण केले. निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस घालविल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सज्जनगडावर विसावा घेतल्यानंतर प्रत्येकाने आपले अनुभव कथन केले.
(चौकट)
१६ वर्षांपासून सहभाग
पदभ्रमंतीचा उपक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात राबविला जातो. शालेय विद्यार्थी, तरुण, नोकरदार तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी दरवर्षी या उपक्रमात सहभाग घेतला. काही सदस्य सलग १६ वर्षांपासून पदभ्रमंतीत सहभाग घेत आहेत. २० वर्षांत ४२ सदस्य या उपक्रमाशी जोडले गेले असून, दरवर्षी ही साखळी वाढत आहे.
(कोट)
निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस घालविण्याचा आनंद खरोखरच अविस्मरणीय आहे. आपले आरोग्य अबाधित रहावे, असा संदेश आम्ही पदभ्रमंतीच्या निमित्ताने दिला. हा उपक्रम अवितरपणे सुरूच राहणार आहे.
- ईश्वर कदम, भैरोबा डोंगरी ग्रुप
फोटो : १४ पदभ्रमंती
साताऱ्यातील भैरोबा डोंगरी ग्रुपने आयोजित केलेल्या पदभ्रमंतीत आबालवृद्धांची उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.