अंबेनळी घाटात पहिल्याच पावसात भिंत ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:31+5:302021-06-11T04:26:31+5:30

महाबळेश्वर : अंबेनळी घाटात जन्नी माता मंदिराजवळ डांबरी रस्त्याकडेला नव्याने बांधण्यात आलेली पाच मीटर संरक्षक भिंत पहिल्याच पावसात ढासळली ...

The wall collapsed in the first rain in Ambenali Ghat | अंबेनळी घाटात पहिल्याच पावसात भिंत ढासळली

अंबेनळी घाटात पहिल्याच पावसात भिंत ढासळली

Next

महाबळेश्वर : अंबेनळी घाटात जन्नी माता मंदिराजवळ डांबरी रस्त्याकडेला नव्याने बांधण्यात आलेली पाच मीटर संरक्षक भिंत पहिल्याच पावसात ढासळली आहे. या घटनेची बांधकाम विभागाने गंभीर दखल घेतली असून, ही भिंत बांधणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. ढासळलेले काम तत्काळ काढून तेथे पुन्हा नव्याने भिंत उभारण्यात यावी, त्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारची बिले अदा केली जाणार नाही, असा इशाराही बांधकाम विभागाने दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणून अंबेनळी घाटाची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील फळे व भाजीपाला याच मार्गे कोकणात जातात. त्याचप्रमाणे मुंबईहून याचमार्गे पर्यटक महाबळेश्वरला येणे अधिक पसंत करतात. अशा महत्त्वाच्या घाटामध्ये मागील दोन महिन्यांपासून रस्त्याकडेला संरक्षक भिंतीचे काम सुरू होते, हे काम करीत असताना काही ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. जन्नीमाता मंदिरापासून जवळच एका वळणात पाच मीटर संरक्षक भिंत कोसळली आहे, ही बाब काही जागृत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांच्या कानावर घातली, त्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली, त्यांनी तातडीने पडझड झालेल्या संरक्षक भिंतीची पाहणी केली. कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यांनी तातडीने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली. या नोटीसमध्ये त्यांनी पडझड झालेले बांधकाम तातडीने काढून घेण्याच्या सूचना करून त्या ठिकाणी पुरेशी खबरदारी घेऊन पुन्हा नव्याने संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश दिले. हे काम पुन्हा योग्यप्रकारे होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कामाचे देयके अदा केली जाणार नाही, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

(कोट..)

कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केला असून, काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. परंतु दोन वर्षांची देखभाल दुरुस्ती ही संबंधित ठेकेदाराकडे असल्याने त्यांनी ते पुन्हा करून देण्याची त्यांची जबाबदारी आहे. शिवाय हे काम तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- महेश गोंजारी, उपविभागीय अभियंता

१०महाबळेश्वर

अंबेनळी घाटात जन्नी माता मंदिराजवळ डांबरी रस्त्याकडेला नव्याने बांधण्यात आलेली पाच मीटर संरक्षक भिंत पहिल्याच पावसात ढासळली आहे. (छाया : अजित जाधव )

Web Title: The wall collapsed in the first rain in Ambenali Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.