कठडे ढासळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:35 AM2021-03-15T04:35:03+5:302021-03-15T04:35:03+5:30
शामगाव : शामगाव घाटातील घाट रस्त्यालगत असणारे सुरक्षा कठडे ठिकठिकाणी ढासळलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी घाटातून प्रवास करणे वाहनचालकांना धोक्याचे ...
शामगाव : शामगाव घाटातील घाट रस्त्यालगत असणारे सुरक्षा कठडे ठिकठिकाणी ढासळलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी घाटातून प्रवास करणे वाहनचालकांना धोक्याचे बनले आहे़ अति तीव्र उतार तसेच धोकादायक वळणे असल्यामुळे अवजड वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने वाहनांचे अपघात टाळण्यासाठी घाट रस्त्यावर ठिकठिकाणी संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.
स्वच्छतागृहांची वानवा
कऱ्हाड : येथील कृष्णा नाक्यापासून कृष्णा पुलापर्यंत कोठेही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक, विक्रेते आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. या परिसरात स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी वारंवार पालिकेत करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कऱ्हाड पालिकेने नागरिकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होत आहे.
अपघाताची शक्यता (फोटो : १४इन्फो०१)
कऱ्हाड : कऱ्हाड- ढेबेवाडी रस्त्यावरील आगाशिवनगर परिसरात सतत रहदारी असते. त्यामुळे मार्गावर जिथे दुभाजक आहेत, त्याठिकाणी गतिरोधक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधक नसल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असतात. यावेळी नेहमी अपघात होत असतात. याची बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन स्पीड ब्रेकर बसवण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बिबट्याचा वावर
पाटण : तालुक्यातील मोरणा विभागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत़ मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग ही सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहेत. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे़
दिशादर्शक फलक (फोटो : १४इन्फो०२)
कऱ्हाड : शहरातील महत्त्वाचे चौक, ठिकाणे तसेच मार्गाबाबत माहिती देणारे सूचना व दिशादर्शक फलक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना माहिती मिळण्यास सोपे झाले आहे. दिशादर्शक व सूचना फलकाअभावी यापूर्वी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.