कोमेजलेला झेंडू एकाच रात्रीत फुलला !

By admin | Published: October 23, 2015 10:09 PM2015-10-23T22:09:24+5:302015-10-24T00:55:15+5:30

बारा तासांत दर सहापटीने वाढला : पूर्वसंध्येला साठ रुपयांना मिळणाऱ्या फुलांची दसऱ्यादिवशी चक्क चारशे रुपयांनी खरेदी-विक्री

The wanderer blossomed in one night! | कोमेजलेला झेंडू एकाच रात्रीत फुलला !

कोमेजलेला झेंडू एकाच रात्रीत फुलला !

Next

संजय पाटील --कऱ्हाड दसरा, दिवाळी आणि पाडवा. फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे सुगीचे दिवस. इतर सणासुदीला फुलांची खरेदी-विक्री होते; पण या तीन सणांच्या कालावधीत फुलाला प्रचंड मागणी असते. बाजारात आवक वाढली की फुलांचे दर ढासळतात. तर कधी आवक घटली की दर दुपटीने वाढतात. या दसरा सणालाही याचाच प्रत्यय आला. एकाच रात्रीत झेंडू फुलला. दर दुप्पट-तिप्पट नव्हे तर चक्क सहापट वाढला. बुधवारी सायंकाळी साठ रुपये किलोने विकला जाणारा झेंडू दसऱ्याच्या सकाळी चारशे ते पाचशे रुपयांवर पोहोचला.जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने ओढ दिल्यामुळे त्याचा सर्वात मोठा फटका फूलशेतीला बसला आहे. पाण्याअभावी फुलांची झाडे होरपळली असून, बाजारात फुलांची आवक मंदावली आहे. अशातच गुरुवारी दसरा सण होता. दसऱ्याला व्यापारी, उद्योजक व घरोघरीही पूजा केली जाते. झेंडूच्या फुलांचे हार, तोरण वाहनांसह दुकानेही सजविली जातात. गुरुवारी दसरा असल्याने बुधवारी सायंकाळपासूनच शहरातील दत्त चौक, मंडई परिसर व मलकापूर येथील शिवछावा चौकातील उड्डाणपुलाखाली झेंडूच्या विके्रत्यांनी फुलांचे स्टॉल लावले होते. बुधवारी दुपारी साठ रुपये किलोपासून ते शंभर रुपये किलोपर्यंत फुलांचा दर होता. त्यावेळी खरेदीदारांना शंभर रुपये दरही जास्त वाटत होता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी फुलांची आवक वाढली की दर आपोआप कमी होईल, या अपेक्षेने बुधवारी अनेकांनी फुले खरेदी करणे टाळले. मात्र, गुरुवारी याउलट परिस्थिती निर्माण झाली.
काही विक्रेत्यांनी बुधवारी सायंकाळी दराची घासाघीस करून फुलांचा नाशवंत माल संपविण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी साठ ते शंभर रुपये किलोने विक्री केलेली फुले रात्रीउशिरा गर्दी वाढल्याने शंभर ते दीडशे रुपयांनी विकली गेली. दसऱ्यादिवशी गुरुवारी सकाळी आठवाजेपर्यंत फुलांचा दर दीडशे रुपयांपर्यंतच होता. मात्र, त्यानंतर अचानकच दर वाढला. फुलांची आवक कमी असल्याचे व ग्राहकांची संख्या जास्त असल्याचे दिसताच विक्रेत्यांनी दर झपाट्याने वाढवले.साठ रुपयांची फुले दीडशे रुपयांवर तर दीडशे रुपयांच्या फुलांचा दर चारशे रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला. चांगल्या फुलांचा दर साडेचारशे रुपये प्रतिकिलो होता. मात्र, तरीही फुले खरेदीसाठी विक्रेत्यांभोवती ग्राहकांची झुंबड होती.
यावर्षी दृष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे फुलांचे उत्पादन कमी झाले. परिणामी, ऐन सण आणि उत्सवाच्या काळात फुलांचा चांगलाच तुटवडा जाणवला. अनेकांनी दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रयत्न केला. खिशात पैसे असूनही फुले न मिळाल्याने वाहने व दुकाने सजविण्याऐवजी एखादा हार लावूनच अनेकांनी पूजा आटोपली. फूलशेती करणाऱ्यांनी मात्र दसऱ्याला खरी सुगी साजरी केली.


पाच रुपयांची माळ तीस रुपयाला
फुलांचा तुटवडा जाणवल्यानंतर नेहमीच्या हार विक्रेत्यांकडे काही प्रमाणात तयार केलेले हार शिल्लक होते. नेहमी ५ रुपयाला विकली जाणारी १० फुलांची माळ दसऱ्याला मात्र ३० रुपयाला विकली गेली. अनेकांनी ही माळ खरेदी करून वाहनाला लावली.



तोरणाची किंमत तीन हजार
कऱ्हाडसह मलकापुरात काही ठिकाणी हारविक्रेते बसतात. वर्षभर त्यांचा हा व्यवसाय सुरू असतो. एरव्ही त्यांच्याकडे पंचवीस रुपयांना मिळणारा हार गुरुवारी मात्र दीडशे रुपयांना होता. त्याच पटीत इतर मोठ्या हारांच्या किमतीही वाढल्या. काही हारांची किंमत तब्बल एक हजार रुपये होती. तर दुकानांना लावले जाणारे तोरण तीन हजारांना विकले जात होते.

दराचा चढता
क्रम
गतवर्षी सरासरी चाळीस ते साठ रुपयांपर्यंत फुलाचे दर होते. त्यावेळी काही विक्रेत्यांनी रात्री उशिरापर्यंत विकली न गेलेली फुले उघड्यावर टाकून दिली होती. यावर्षीच्या श्रावण महिन्यात घाऊक बाजारात फुलांचा दर आणखी दहा ते बारा रुपये किलोपर्यंत खाली गेला. त्यामुळे झेंडूचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर गणेशोत्सवाच्या कालावधीत झेंडूचा दर साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलो होता. फुलांचा दर वाढणार हे लक्षात येऊनही त्यावेळी रोपांची लागवड करणे शक्य नव्हते. अशातच दसऱ्याला फुलांचे दर चारशे रुपयांपेक्षा जास्त झाले.

चोरट्यांनी घेतला गर्दीचा फायदा
गुरुवारी सकाळी ठराविक विक्रेत्यांकडेच फुले शिल्लक होती. त्यामुळे खरेदीदारांनी या विक्रेत्यांभोवती गोंधळ घातला. प्रत्येकजण आपल्याला फुले मिळावीत, यासाठी धडपडत होता. मात्र, या गर्दीचा फायदा काही चोरट्यांनी घेतला. काहींनी स्वत:च्याच हाताने पिशव्या भरून फुलांची चोरी केली. तर काहींनी विके्रत्यांची नजर चुकवून पैशांसह फुले घेऊन पोबारा केला.

Web Title: The wanderer blossomed in one night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.