हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:33+5:302021-05-12T04:40:33+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी शोधावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
तालुक्यातील घाडगेवाडी या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. वारंवार पंचायत समिती व तहसीलदारांच्याकडे मागणी करूनही टँकर देण्यात आला नाही. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मुळातच डोंगराच्या कडेला असणाऱ्या या गावात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. त्यातच गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने उन्हाळ्याच्या चार महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई भासते. यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याने प्रश्न अधांतरीच आहे.
(कोट)
घाडगेवाडी गावाला प्रतिवर्षी पाण्याचा प्रश्न भेडसावतो. यासाठी ग्रामजल योजनेतून योजना राबणे आवश्यक आहे. सध्या एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत पाणी सोडले जाते. त्यानंतर गावच्या टाकीत पाणी जाते. यानंतर चार दिवसांतून लोकांना पाणी दिले जाते मात्र त्याचे प्रमाण कमी आहे पाण्यासाठी इतर दिवशी लोकांना यातना सहन कराव्या लागत आहेत.
- हिरालाल घाडगे, उपसरपंच, घाडगेवाडी
फोटो : ११ खंडाळा
खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे पाणीटंचाई भासू लागली असून, ग्रामस्थांना विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.